संचमान्यतेचा तिढा सुटता सुटेना
By Admin | Updated: August 21, 2015 02:59 IST2015-08-21T02:59:21+5:302015-08-21T02:59:21+5:30
शैक्षणिक सत्र २०१५-१६ सुरू झाले, तरी अजूनही २०१४-१५ च्या संचमान्यता शाळांना प्राप्त झाल्या नाही. मागीलवर्षी सर्व शाळांनी आॅनलाईन संचमान्यता पाठविल्या होत्या.

संचमान्यतेचा तिढा सुटता सुटेना
वणी : शैक्षणिक सत्र २०१५-१६ सुरू झाले, तरी अजूनही २०१४-१५ च्या संचमान्यता शाळांना प्राप्त झाल्या नाही. मागीलवर्षी सर्व शाळांनी आॅनलाईन संचमान्यता पाठविल्या होत्या. मात्र त्यांना अद्याप मूर्तरूप आले नाही.
शाळेतील वर्ग तुकड्या व विद्यार्थी संख्या किती आहे, यावरून शाळेला मान्य होणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंजूर होतात. तेवढ्याच कर्मचाऱ्यांचे वेतन शासन अदा करते. शालेय वेळापत्रकानुसार अध्यापन होण्यासाठी शाळेत आवश्यक शिक्षक कार्यरत असणे गरजेचे असते. मंजूर शिक्षकांपेक्षा कमी शिक्षक असल्यास, त्या शाळेला शिक्षक नियुक्त करण्याची परवानगी देणे, शाळेत जादा शिक्षक असल्यास त्यांचे समायोजन इतर शाळेतील रिक्त जागांवर करण्याची प्रक्रिया शिक्षणाधिकारी यांना करावी लागते. मात्र मागील दोन वर्षांपसून ही प्रक्रियाच ठप्प पडली आहे.
सन २०१३-१४ च्या संचमान्यता घाईघाईने शाळांना देण्यात आल्या. मात्र त्या संचमान्यतेनुसार शाळांना ना जादा पदे भरण्यास मिळाली, ना अतिरिक्त पदांचे समायोजन झाले. केवळ अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाईनमध्ये टाकून त्यांना समूहापासून वेगळे करण्यात आले. आरटीईनुसार व्यपगत झालेल्या पदांवरील कर्मचाऱ्यांचे काय करायचे, याची उकल शासन अजूनही करू शकले नाही. त्यामुळे राज्यातील हजारो प्रयोगशाळा परिचर व नाईक अद्याप अधांतरीच लटकलेले आहे. त्यातील काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्या कमी करता येते. मात्र शासन पदोन्नती देण्यास तयार नाही. नाईकांची शिपाई या पदावर पदावनती करण्यास मात्र शासन राजी आहे.
या सर्व गोंधळामुळे सन २०१४-१५ च्या संचमान्यता अजूनही तयार झाल्या नाही. मोफत सक्तीच्या शिक्षणाच्या अध्यादेशाने त्यात आणखीनच गोंधळ वाढविला आहे. स्तर रचना बदलविल्याने त्यानुसार शाळांची फेररचना करण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. या अध्यादेशामध्ये पहिली ते आठवीसाठी मंजूर शिक्षकांची पदे, ही विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर ठरविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची पदे ही दरवर्षी बदलत जाणार आहे. त्यासाठी शाळांच्या संचमान्यता दरवर्षी आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणे आवश्यक आहे. नववी ते बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांची पदे कार्यभारावरून ठरविली जाणार आहे. त्यामुळे एकाच शाळेत पाचवी ते दहावीचे वेळापत्रक तयार करताना विषमता निर्माण होत आहे. या गोंधळामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने कार्यरत शिक्षकांवर कार्यभाराचे ओझे वाढले आहे. काही शाळांमध्ये अधिक शिक्षक असल्याने थोड्या कामात पूर्ण वेतन त्यांच्या हाती पडत आहे. आॅनलाईन व आॅफलाईन वेतनामुळे शाळांच्या इतर कपातीचा भरणा करताना व त्याचे हिशेब लिहिताना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे सन २०१४-१५ च्या संचमान्यता केव्हा हाती पडते व त्यानुसार शिक्षणाचा गाडा केव्हा सुरळीत होतो, याची प्रतीक्षा सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी व व्यवस्थापन या सर्वांनाच लागली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)