राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका
By Admin | Updated: December 25, 2014 23:38 IST2014-12-25T23:38:58+5:302014-12-25T23:38:58+5:30
आपल्या गावातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याचा आनंद अनेकांना झाला होता. विविध व्यवसाय सुरू होऊन हाताला काम आणि सुविधा परिसरात सुरू होईल, असे त्यांना वाटत होते. मात्र हाच महामार्ग

राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका
मंगेश चवरडोल - किन्ही(जवादे)
आपल्या गावातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याचा आनंद अनेकांना झाला होता. विविध व्यवसाय सुरू होऊन हाताला काम आणि सुविधा परिसरात सुरू होईल, असे त्यांना वाटत होते. मात्र हाच महामार्ग आता जीवघेणा ठरत आहे. गेली सात दिवसात वडकी ते किन्ही (जवादे) या अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरात तीन अपघात झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे.
परिसरातील गावांसाठी वडकी हे गाव केंद्रबिंदू आहे. बाजारपेठ, रुग्णालय, पोलीस ठाणे, शाळा-महाविद्यालय यासाठी नागरिकांना या गावात जावेच लागते. परंतु या गावाहून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र.७ धोक्याचा ठरत आहे. जागोजागी पडलेले पाच ते सात फुटाचे रूंद आणि एक फुटाच्यावर पडलेले खोल खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. फुटभरही रस्ता सुस्थितीत नाही. परस्पर विरूद्ध दिशेने धावणारी वाहने खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात एकमेकांवर केव्हा आदळेल याचा नेम राहिला नाही. दुचाकी वाहनधारकांना तर या रस्त्याने ये-जा करणे म्हणजे अतिशय धोक्याचे आहे. अवजड वाहनांच्या गर्दीत लहान वाहने कधी चेपली जाईल याचा नेम नाही. एवढी दयनीय अवस्था झाली असतानाही हा मार्ग दुरुस्त करण्यासाठी संबंधितांकडून काही एक प्रयत्न होताना दिसत नाही.
वडकी येथे व्यवसाय करीत असलेल्या येथील गणपत परचाके याला बोरी गावाजवळ अपघात झाला. तो दुचाकीने प्रवास करत होता. वडकीचे ठाणेदार अमोल माळवे यांनी त्याला तत्काळ सेवाग्राम येथे हलविले. धुमका येथील शिक्षक कुमरे हे शाळेतून परतताना खड्ड्यामुळे बोरी येथे त्यांना अपघात झाला. त्यांना हिंगणघाट येथे हलविण्यात आले. दहेगाव येथील शेख यांनाही बोरी गावाजवळच खड्ड्यामुळे अपघात झाला. केवळ पाच किलोमीटरच्या अंतरात झालेले हे तीनही अपघात प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. या भागातील काही विद्यार्थी सायकलने वडकी येथे शिकण्यासाठी जातात. त्यांच्याही जीवितास धोका होण्याची भीती आहे. परिसरातील लोकप्रतिनिधी मात्र याविषयी उदासीन असल्याचे दिसून येते.