राज्यात दुसरी ते पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:22 IST2018-07-31T14:20:41+5:302018-07-31T14:22:56+5:30
पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता दुसरी ते पाचवी या वर्गांचा अभ्यासक्रमही नव्या स्वरूपात येणार आहे. यातील दुसरीचा नवा अभ्यासक्रम २०१९-२० या सत्रापासूनच लागू होणार असून त्यापुढील प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलणार आहे.

राज्यात दुसरी ते पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता दुसरी ते पाचवी या वर्गांचा अभ्यासक्रमही नव्या स्वरूपात येणार आहे. यातील दुसरीचा नवा अभ्यासक्रम २०१९-२० या सत्रापासूनच लागू होणार असून त्यापुढील प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलणार आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) नवीन अभ्यासक्रमाच्या रचनेसाठी तयारी सुरू केली आहे. दुसरीचा अभ्यासक्रम लगेच बदलविण्याचा निर्णय झाल्याने या संदर्भात अभ्यासक्रम पुनर्रचना व पाठ््यपुस्तक निर्मिती समितीसाठी राज्यातील १५४ जाणकारांची निवडही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी आठवीचा नवा अभ्यासक्रम लागू करताना बालभारतीने निवडक तज्ज्ञांची समिती गठित केली होती. तर पहिलीचा नवा अभ्यासक्रम या समितीने अवघ्या दीड महिन्यात ‘फायनल’ केल्याची माहिती आहे.
ही बाब लक्षात घेता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अभ्यासक्रम पुनर्रचना समितीसाठी राज्यभरातून प्रस्ताव मागविण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील १५४ शिक्षकांना समितीसाठी पाचारण करण्यात आले आहे. आता बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्या उपस्थितीत पुणे येथे १ ते ३ आॅगस्टदरम्यान या तज्ज्ञ शिक्षकांची कार्यशाळा होणार असून त्यातूनच दुसरी ते तिसरीच्या नव्या अभ्यासक्रमाचा आराखडा ठरणार आहे.
समितीत विदर्भातील ३९ जण
बालभारतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील १५४ तज्ज्ञ शिक्षकांनी अभ्यासक्रम पुनर्रचना समितीत सहभाग घेतला. यात विदर्भातील ३९ जणांचा समावेश आहे. यवतमाळातून चार, चंद्रपूर एक, भंडारा एक, अमरावती पाच, बुलडाणा चार, नागपूर नऊ, गडचिरोली एक, अकोला सात, वाशिम एक, वर्धा एक तर गोंदियातून पाच शिक्षक या समितीत आहेत. आता पुण्यातील कार्यशाळेदरम्यान यातील काही जणांची नावे गळण्याची शक्यता आहे.