तळमळणारे रुग्ण अन् डॉक्टरांचा शोध
By Admin | Updated: June 26, 2014 23:30 IST2014-06-26T23:30:48+5:302014-06-26T23:30:48+5:30
जिल्हा मुख्यालयी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत सर्वच ठिकाणी रुग्णांना डॉक्टरांची शोधाशोध करतात. डॉक्टरांअभावी परिचारिकांवर

तळमळणारे रुग्ण अन् डॉक्टरांचा शोध
आरोग्य यंत्रणेची पोलखोल : घाणीचा विळखा आणि शुद्ध पाण्याचा सर्वत्र अभाव
यवतमाळ - लोकमत चमू
जिल्हा मुख्यालयी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत सर्वच ठिकाणी रुग्णांना डॉक्टरांची शोधाशोध करतात. डॉक्टरांअभावी परिचारिकांवर उपचाराची जबाबदारी आली असून ग्रामीण रुग्ण मात्र त्यातच धन्यता मानतात. जागेअभावी जमिनीवर झोपलेले रुग्ण आणि बेफिकीर वैद्यकीय अधिकारी असे वास्तव ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टींग आॅपरेशनने उघड झाले.
शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह तालुका मुख्यालयी असलेल्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयाचे ‘लोकमत’ चमूने गुरुवारी एकाच वेळी स्टींग आॅपरेशन केले. या स्टींग आॅपरेशनने आरोग्य यंत्रणेची पोलखोल झाली असून काही रुग्णालय याला अपवादही आहेत. यवतमाळचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णांच्या गर्दीने भरुन असल्याचे गुरुवारी दिसून आले. नोंदणी कक्षापासून ते बाह्यरुग्ण विभागासमोर रुग्णांच्या रांगा लागलेल्या होत्या.
अन् रुग्णांचे प्राण वाचले
सवना ग्रामीण रुग्णालयात सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान प्रल्हाद गोटे (४३) हा डायरियाचा रुग्ण आला. त्यावेळी डॉक्टर उपस्थित नव्हते. रुग्णाची अवस्था पाहून उपस्थित परिचारिकेने प्रथमोपचार करून सलाईन लावले. मात्र काही वेळातच त्याला घाबरल्यासारखे वाटू लागले. प्रस्तूत प्रतिनिधीला हा प्रकार दिसला. त्याने ही बाब उपस्थितांच्या लक्षात आणून दिली. एवढेच नाही तर तेथे असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाच्या डॉक्टरांना तत्काळ बोलावून आणले. यावेळी त्याचा रक्तदाब मोजला असता २८८ भरला. त्यानंतर त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. वेळेवर उपचार मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचले.
नातेवाईकांची गर्दी
रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून बाहेर काढले जाते. सकाळी ९ वाजतापासून वॉर्डातून नातेवाईक बाहेर येत होते. या नातेवाईकांची गर्दी रुग्णालयाच्या परिसरात झाली होती. तसेच येणाऱ्या अॅम्बुलन्स डॉक्टरांच्या खासगी गाड्या आणि नातेवाईकांची वाहने याने परिसर फुलून गेला होता. कोंदड आणि कोबट दुर्गंधी नित्याप्रमाणेच आजचा दिवसही सुरू होता.
धो-धो पाणी
शहरासह जिल्ह्यात पेयजल संकट आहे. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उलट चित्र आहे. या ठिकाणी परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. परंतु कोणत्याही नळाला तोटी नाही. त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाहून जात असल्याचे दृश्य दिसत होते.