कोळसा वाहनांना ठोकले सील
By Admin | Updated: March 29, 2015 00:06 IST2015-03-29T00:06:12+5:302015-03-29T00:06:12+5:30
तालुक्यात कोळशाच्या जवळपास १२ खाणी आहेत. या खाणींमधून येथील रेल्वे सायडिंगवर मोठ्या प्रमाणात कोळसा येतो.

कोळसा वाहनांना ठोकले सील
आसिफ शेख वणी
तालुक्यात कोळशाच्या जवळपास १२ खाणी आहेत. या खाणींमधून येथील रेल्वे सायडिंगवर मोठ्या प्रमाणात कोळसा येतो. ही संधी साधून कोळसा चोरटे रस्त्यातच ट्रकमधून कोळसा पाडून त्याची तस्करी करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता वर्धा पॉवर स्टेशनने चक्क ट्रकवर टाकलेल्या कापडी पालला सील लावण्याची शक्कल लढविली आहे.
वणी-पिंपळगाव-ब्राह्मणी मार्ग, मुंगोली-शिरपूर-वणी मार्ग, घुग्गस-वणी, घोन्सा-वणी, नागलोन (वरोरा) वणी मार्गावरून विविध खाणींमधून कोळसा वणी रेल्वे सायडिंगवर मोठ्या प्रमाणात येत असतो. येथे रेल्वे सायडिंगवर हा कोळसा साठविला जातो. तेथून तो रेल्वे वॅगनने नियोजित उद्योगांना पाठविण्यात येतो. मात्र खाणींमधून रेल्वे सायडिंगवर कोळसा भरून येणाऱ्या वाहनांमधून रस्त्यातच कोळसा चोरला जातो. कोळसा चोरट्यांची एक टोळीच त्यासाठी सक्रिय आहे.
सायंकाळनंतर कोळशाची वाहने रेल्वे सायडिंगकडे येताना काही चोरटे वाटलेल्या रस्त्यावर उभे असतात. ते चालत्या वाहनातून अथवा कोळसा भरलेल्या वाहन चालकाला आमिष देऊन वाहनातून कोळसा खाली पाडतात. तो एका ठिकाणी गोळा केला जातो. तेथे गोळा झालेला हा चोरीचा कोळसा विविध लहान वाहनांतून कोळसा बाजारपेठेत पोहोचवितात. हे संपूर्ण काम रात्रीच्या वेळी चालते. त्यामुळे उद्योगांना कमी कोळसा जातो. परिणामी कोळशाच्या या वाट तस्करीने अनेक उद्योजक वैतागले आहे.
काही मोठे कोळसा चोर तर कोळशाचे वाहनच गायब करतात. त्या वाहनातील भरपूर कोळसा खाली करून त्यात काळे दगड व खराब कोळसा टाकून ते वाहन रेल्वे सायडिंगवर रवाना केले जाते. कोळशात दगड असल्याने विद्युत निर्मिती कंपनीचे बॉयलर खराब होतात. त्यात बिघाड येतो. परिणामी विद्युत निर्मितीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे त्रस्त झालेल्या वर्धा पॉवर प्लॉन्ट कंपनीने आता नामी शक्कल शोधून काढली आहे.
वर्धा पॉवर कंपनीने उकणी येथील कोळसा खाणीसोबत १५ वर्षांसाठी कोळसा पुरविण्याचा करार केला आहे. या खाणीतून येथील रेल्वे सायडिंगवर कोळसा येतो. तो नंतर रेल्वेने वर्धा पॉवर कंपनीला पाठविला जातो. आता रस्त्यात वाहनातून कोळशाची चोरी होऊ नये म्हणून उकणी कोळसा खाणीतून कोळसा भरल्यानंतर त्या वाहनावर पाल टाकला जात आहे. त्याला दोरीच्या साहाय्याने बांधले जाते. ती दोरी वाहनाच्या हुकला लटकविली जाते. अशा प्रत्येक हुकला आता ‘सील’ लावले जात आहे. त्यासाठी वर्धा पॉवर कंपनीचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे.
संबंधित वाहन येथील रेल्वे सायडिंगवर पोहोचताच प्रथम कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आता ‘सील’ व्यवस्थित आहे की नाही, याची तपासणी करतात. सील व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यानंतर त्या वाहनातील कोळसा रेल्वे सायडींगवर उतरविला जात आहे. ‘सील’मध्ये गडबड आढळल्यास त्याची सूचना वर्धा पॉवर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाते. या ‘सील’ पद्धतीने कोळशाची बारीक भुकटीही जमिनीवर पडत नाही. त्यामुळे प्रदूषणही वाढत नाही व कोळसा चोरीला काही प्रमाणात आळाही बसला आहे.
चोरट्यांची नवीन युक्ती फसली
चोरट्यांनीही आता कोळसा चोरीसाठी नवीन शक्कल लढविली आहे. उकणी कोळसा खाणीच्या एका डम्पर आॅपरेटरला आपल्या विश्वासात घेऊन त्यांनी एक डम्पर कोळसा उकणी गावाच्या नवीन वस्तीजवळ टाकला. २३ मार्चला रात्री हा कोळसा दोन पीक अप वाहनांच्या साहाय्याने तो कोळसा तेथून उचलण्यात आला. मात्र कोळसा खूप जादा प्रमाणात असल्याने चोरट्यांचा डाव फसला. काही कोळसा तेथेच सापडून उकणी खाण प्रबंधकला त्याची माहिती मिळाली. त्यांनी चोरीचा शोध लावण्यासाठी अनेकांची झडती घेतली. आता या प्रकरणात विभागीय चौकशी सुरू आहे. प्रबंधकने त्या ठिकाणचे कोळसा नेणाऱ्या वाहनाचे टायर व इतर काही वाहनांच्या टायरच्या खुणांवरून शोधाशोध सुरू केली आहे. हा कोळसा चोर कोण?, याचा आता शोध घेतला जात आहे. कोळसा चोरट्यांनी आता खुद्द वेकोलि कर्मचाऱ्यांनाच हाताशी धरून नवीन युक्ती अवलंबली आहे. मात्र त्यांचा हा डाव तूर्तास पूर्णपणे फसला आहे.