सीलबंद भागात भाजीपाला, दूध पोहोचलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:16+5:30
रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घराबाहेर पडता येत नाही आणि घरात दोन वेळ पुरेल इतकेही राशन नाही. जवळ ठेवलेला पैसाही संपला आहे. पालिकेकडून पुरविण्यात येत असलेला भाजीपाला व इतर वस्तू खरेदी कशाने करायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषदेने इंदिरानगर व परिसर, मेमन कॉलनी व परिसर, जफरनगर व परिसर या भागासाठी एकूण चार पथक तयार केले आहे.

सीलबंद भागात भाजीपाला, दूध पोहोचलेच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील प्रभाग १० व २० या परिसरात एकाच वेळी आठ कोरोना रुग्ण आढळले. यामुळे हा संपूर्ण परिसर सील केला आहे. या भागात ७० टक्के रोजमजुरी करणारा वर्ग आहे. भोसा गावातील पोडाची स्थिती अशीच आहे. भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी नेण्याची जबाबदारी नगरपरिषदेवर आहे. मात्र तीन दिवस लोटूनही अनेक भागात भाजीपाला, दूध व इतर वस्तू पोहोचल्याच नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घराबाहेर पडता येत नाही आणि घरात दोन वेळ पुरेल इतकेही राशन नाही. जवळ ठेवलेला पैसाही संपला आहे. पालिकेकडून पुरविण्यात येत असलेला भाजीपाला व इतर वस्तू खरेदी कशाने करायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषदेने इंदिरानगर व परिसर, मेमन कॉलनी व परिसर, जफरनगर व परिसर या भागासाठी एकूण चार पथक तयार केले आहे. या एका पथकामध्ये चार कर्मचारी आहे. बुधवारी रात्रीच हा परिसर सील करण्यात आला. गुरुवारपासून या भागातून कुणालाही घराबाहेर पडता आले नाही. प्रत्येक कुटुंबालाच घरात १४ दिवस रहावे लागणार आहे. अशा स्थितीत प्रशासनाने गरीब व रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी किमान राशन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. या भागात भंगार विकणारे, फळ विक्रेते, बांधकाम मजूर मोठ्या प्रमाणात आहे.
भोसा या मूळ गावातील पोडावरची अवस्था अतिशय बिकट आहे. निरक्षर असलेल्या या ठिकाणी अजूनपर्यंत पालिकेचे कर्मचारी पोहोचले नसल्याचे तेथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दोन वेळच्या जेवणाचा तरी प्रश्न सुटावा ही माफक अपेक्षा असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
पाळीव जनावरांची उपासमार
सील बंद करण्यात आलेल्या भोसा गावात बहुतांश घरी दुधाळ जनावरे आहेत. गाई, म्हशी, शेळ्या व शेतीपयोगी बैलजोड्या आहे. तीन दिवसांपासून या जनावरांना घरीच चारा टाकणे सुरू आहे. आता साठवलेला चाराही संपुष्टात आला आहे. त्यांना बाहेर नेऊन चारणे शक्य नाही व चाराही आणता येत नाही. त्यामुळे या जनावरांची उपासमार होत आहे.
नगरपरिषदेची भाजीविक्री सुरू
सील केलेल्या जफरनगर, इंदिरानगर व भोसा परिसरात नगरपरिषदेकडून भाजी विक्री सुरू आहे. ३० लिटर दुधाचे वितरण केले. स्थानिक काही विक्रेते पुढे आल्यास त्यांना परवानगी देण्यात येईल. याशिवाय गरीब कुटुंबांना आतापर्यंत ५०० किलो तांदळाचे वाटप केले आहे. स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांनी केले आहे.
पैसे अडकले बँकेत
नगरपरिषद जीवनावश्यक वस्तूंची विक्री परिसरात करीत आहे. मात्र अनेकांजवळ आता घरात रोख रक्कम नाही. बँकेत पैसे असल्याने ते काढायला जाण्याची सोय नाही. घरी पैसे नसल्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाही. किमान भोसा परिसरात एखादे एटीएम खुले करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.