वीजबिल भरण्यासाठी उत्पन्नाचे साधन नसल्याने शाळा डिजिटलपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:40 IST2025-01-23T18:32:13+5:302025-01-23T18:40:23+5:30
आ. किसनराव वानखेडे : अधिवेशनात प्रश्न मांडण्याची दिली ग्वाही

Schools are deprived of digital access due to lack of income to pay electricity bills
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : वीजबिल भरण्यासाठी शाळांकडे उत्पनाचे साधन नसल्याने शाळा डिजिटल होण्यापासून वंचित आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त करीत शाळांना वीजबिल भरण्यासाठी शेष राशी मंजूर करण्यासंदर्भात येत्या अधिवेशनात सभागृहात मागणी करणार असल्याचे आमदार वानखेडे यांनी सांगितले.
उमरखेड महागाव तालुक्यांतील आढावा बैठकीत आमदार किसनराव वानखेडे बोलत होते. शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उमरखेड, महागाव तालुक्यांचा आढावा घेण्यात आला.
घरकुल योजनेच्या कामाचाही घेतला आढावा
यावेळी आमदार किसनराव वानखेडे यांनी उमरखेड व महागाव तालुक्यातील घरकुल योजनेच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. विभाजित कुटुंबास मंजूर झालेले घरकुल केवळ जागेअभावी रखडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. यावेळी त्यांनी लाभार्थ्यास वडिलोपार्जित जागेचा स्व-मालकी फेरफार होईपर्यंत त्या लाभार्थ्यास घरकुलासाठी मुदत देण्यात येईल, असेही आमदार वानखेडे यांनी सांगितले. बैठकीला उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
बैठकीला महागाव गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, उमरखेड गटविकास अधिकारी किरण कोळपे, भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, उमरखेड खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुदर्शन रावते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप हिंगमिरे, दत्तदिगंबर वानखेडे आदी उपस्थित होते.
रस्ते निर्मितीची गती वाढविण्याचे निर्देश
ई-क्लास जागेवरील प्रस्तावित घरकुलधारकांना त्या जागेच्या मालकी हक्काविषयी आगामी अधिवेशनात भूस्वामीत्वचा प्रश्न मांडणार असल्याचे ते म्हणाले. तसेच गावठाण हद्दवाढीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावेत. जेणेकरून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून हद्दवाढीस मंजुरात मिळवून घेता येईल, रस्तेनिर्मितीवेळी पंचायत समितीचे संबंधित कर्मचारी उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्तेनिर्मितीची गुणवत्ता वाढेल, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.