शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क सेस फंडातून
By Admin | Updated: January 3, 2015 23:09 IST2015-01-03T23:09:59+5:302015-01-03T23:09:59+5:30
जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत सर्वसामान्य मुलांना दिलासा देणारा ठराव घेण्यात आला. ग्रामीण भागातील मुलांकडे बरेचदा शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी पैसे राहात नाही.

शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क सेस फंडातून
यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत सर्वसामान्य मुलांना दिलासा देणारा ठराव घेण्यात आला. ग्रामीण भागातील मुलांकडे बरेचदा शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी पैसे राहात नाही. त्यामुळे अशा अडचणीत असलेल्या मुलांचा भार शिक्षण विभाग उचलणार आहे. त्यासाठी सेस फंडातून विशेष तरतूद केली जाणार आहे.
तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठीसुध्दा सेस फंडातून निधी देण्याचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला. चांगली शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या शाळांची निवड करून त्यांचा सत्कार करण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी तीन प्राथमिक आणि तीन उच्च प्राथमिक शाळांची निवड केली जाणार आहे. शाळांच्या गुणवत्तेचे म्ूुल्यमापन करण्यासाठी पथकाचे गठन करून त्यांना भौतिक सुविधा देण्यात येणार आहे.
शाळा अनुदानातून साहित्य खरेदी करून त्याला कात्री लावण्यात येवू नये, असे निर्देश देण्यात आले. आजारी शिक्षकांच्या देयेकाचा मुद्दा दिगांबर जगताप यांनी बैठकीत उपस्थित केला. वर्षा पाटील आणि संदीप हिंंगमिरे यांनी शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केली जावी, अशी मागणी केली. याची तत्काळ दखल घेऊन सभापती नरेंद्र ठाकरे यांनी तसे निर्देश सर्व
गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्याचा आदेश दिला.
बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, उपशिक्षाधिकारी वाल्मिक इंगोले, समिती सदस्य द्वारका पारध, अल्का टेकाम, अॅड़ सीमा तेलंगे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)