साश्रू नयनांनी राधाला अखेरचा निरोप
By Admin | Updated: May 31, 2014 00:11 IST2014-05-31T00:11:58+5:302014-05-31T00:11:58+5:30
कालपर्यंत त्या घराला तिचे बोबडे बोल आणि हसतमुख चेहर्याची सवय झाली होती. तिच्या हसण्याने घरात आनंदाला उधाण यायचे. मात्र अचानक तिला ताप आला आणि यातच तिची अखेर झाली.

साश्रू नयनांनी राधाला अखेरचा निरोप
डेंग्यूचा बळी : जवळगावातील प्रत्येक जण हळहळला
किशोर वंजारी - नेर
कालपर्यंत त्या घराला तिचे बोबडे बोल आणि हसतमुख चेहर्याची सवय झाली होती. तिच्या हसण्याने घरात आनंदाला उधाण यायचे. मात्र अचानक तिला ताप आला आणि यातच तिची अखेर झाली. जवळगाव येथील राधा गुघाणे या निष्पाप बालिकेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला आणि गावाचे काळीज थरथरून गेले. तिचे कलेवर गावात आणले तेव्हा प्रत्येकाच्या मनात चर्र होत होते. अखेर नियतीपुढे गावकरी हतबल झाले. जड अंत:करणाने आणि साश्रू नयनांनी जवळगावकरांनी राधाला अखेरचा निरोप दिला.
नेर तालुक्यातील जवळगाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. यापूर्वीसुद्धा एका बालिकेचा मृत्यू झाला. गावामध्ये तापाने फनफनणारी अनेक बालके असल्यामुळे गावात भीतीयुक्त वातावरण आहे. अनेकांनी आपल्या मुलांना परगावी नेवून ठेवले आहे. आरोग्य विभागाने गावामध्ये शिबिर लावले होते. कोरडा दिवसही पाळण्यात आला होता. मात्र मृत्यूचे हे तांडव थांबायला तयार नाही. कोवळ्या कळ्या अचानक मृत्यूच्या खाईत लोटल्या जात आहे. राधाच्या मृत्यूने संपूर्ण गाव हादरले आहे. राधा अनेकांची लाडकी होती. न बोलाविता कुणाच्याही घरी जावून आपल्या बोबड्या बोलांनी ती अनेकांना मोहीत करायची. राधा गेल्याची वार्ता ऐकताच गावाच्या अंत:करणात गलबल झाली. अनेकांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली. आपल्या लाडक्या लेकीच्या मृत्यूने राधाचे आई-वडील स्तब्ध झाले आहेत. कालपर्यंत अंगाखांद्यावर खेळणारी चिमुकली अचानक निघून गेल्यामुळे राधाच्या आई-वडिलांना सुचेनासे झाले आहे.
राधावर नुकतेच जवळगाववासीयांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. कुठल्याही लोकप्रतिनिधीला याची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून गावात डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू आहे. जिल्ह्याचा आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत आहे.
स्थानिक ग्रामपंचायतीचे राजकारण विकासाच्या आड येत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी गावात अस्वच्छतेने कहर केला आहे. या आजाराचे मूळ काय, हे अजूनही लक्षात आले नसले तरी राधाचा झालेला मृत्यू हा डेंग्यू या आजारानेच झाला आहे. जवळगावपासून प्राथमिक आरोग्य केंद्र २५ किलोमीटर अंतरावर आहे. नागरिकांना पायपीट करत तेथे जावे लागते. राधाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जवळगाववासीयांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची मागणी केली आहे. प्रशासन आणखी किती राधाच्या बळी जाण्याची वाट पाहात आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जावू लागला आहे.