रेती तस्कर महसूल विभागाच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:17 IST2018-11-29T22:16:43+5:302018-11-29T22:17:04+5:30
वणी परिसरातील नद्या व नाल्यांना पोखरून त्यातील लाखो रूपये किमतीची रेती चोरट्या मार्गाने पळविणारे तस्कर सध्या महसूल विभागाच्या रडारवर आहे. येथे नव्यानेच रूजू झालेल्या तहसीलदारांनी या तस्करांविरूद्ध कारवाईचा धडाका सुरू केला असून त्यामुळे तस्करांच्या मनात धडकी भरली आहे. या

रेती तस्कर महसूल विभागाच्या रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी परिसरातील नद्या व नाल्यांना पोखरून त्यातील लाखो रूपये किमतीची रेती चोरट्या मार्गाने पळविणारे तस्कर सध्या महसूल विभागाच्या रडारवर आहे. येथे नव्यानेच रूजू झालेल्या तहसीलदारांनी या तस्करांविरूद्ध कारवाईचा धडाका सुरू केला असून त्यामुळे तस्करांच्या मनात धडकी भरली आहे.
यापूर्वीचे तहसीलदार रवींद्र जोगी यांच्या बदलीनंतर बराच काळ तहसीलदार पद रिक्त होते. या काळात वणी तालुक्यातील रेती तस्करांनी अक्षरश: उच्छाद मांडला होता. काही महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या तस्करांनी नदी, नाल्यातील लाखो रूपयांची रेती लंपास केली.
वणी तालुक्यातून निर्गुडा, वर्धा, विदर्भा या नद्यांसह अनेक मोठे नाले आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या नदी-नाल्यांमध्ये चांगल्या प्रतीची रेती आली आहे. नदीवरील रेती घाटांचा अद्याप लिलाव झाला नाही. नेमकी हीच संधी साधून तस्करांनी डोकेवर काढले. काही भ्रष्ट महसूल कर्मचाºयांना हाताशी धरून या तस्करांनी नदीचे घाट अक्षरश: कुरतडून टाकले. काही ठिकाणी जेसीबी मशिनद्वारेही उत्खनन करण्यात आले. तस्करांमुळे सर्वाधिक बाधा विदर्भा नदीला पोहोचली. वणी तहसीलदारपदी नुकतेच एस.एम.धनमने रूजू झाले. त्यांनी घेतलेल्या पहिल्या आढावा बैठकीत रेती तस्करीच मुद्दा ऐरणीवर आला. याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता, त्यांनी तातडीने एका विशेष पथकाचे गठण करून या पथकाला तस्करांविरूद्ध कारवाईचे आदेश बजावले. गेल्या काही दिवसांपासून वणी तालुक्यात या भरारी पथकाची गस्त सुरू असून आठ दिवसांमध्ये या पथकाने रेती तस्करी करणारे सहा ट्रॅक्टर व एक टिप्पर पकडून त्यांच्याकडून साडेसहा लाख रूपयांचा दंड वसुल केला. या धडक कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत व तहसीलदार एस.एम.धनमने यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डी.एस.वासनिक, व्ही.व्ही.पवार, एस.एस.रामगुंडे व पथकातील कर्मचाºयांनी केली.