दीड लाख विद्यार्थी रंगीबेरंगी पोषाखात देणार तिरंग्याला सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 22:45 IST2017-08-13T22:44:32+5:302017-08-13T22:45:17+5:30
शाळा सुरू होऊन पावणे दोन महिने झाले, पण जिल्ह्यातील तब्बल दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय गणवेशच मिळालेला नाही.

दीड लाख विद्यार्थी रंगीबेरंगी पोषाखात देणार तिरंग्याला सलामी
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शाळा सुरू होऊन पावणे दोन महिने झाले, पण जिल्ह्यातील तब्बल दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय गणवेशच मिळालेला नाही. आता तर स्वातंत्र्यदिनही आला. त्यामुळे झेंडावंदनाला जुनाट आणि रंगीबेरंगी परिधानातील विद्यार्थी पाहून शिक्षकांच्या चेहºयावरचा रंग मात्र उडणार आहे. स्वातंत्र्यदिनी भोंगळ कारभार जनमानसात उघडा होणार या भीतीने शिक्षण विभाग ऐन वेळी जागा झाला असून ऐन स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी गणवेश खरेदीचा अहवाल मागविण्यात आला आहे.
सर्व शिक्षा अभियानातून जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ५११ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणे क्रमप्राप्त होते. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने त्यासाठी ६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीही मंजूर करून जिल्हास्तरावर वर्ग केला. परंतु, जिल्हास्तरावर ही योजना राबविण्याबाबत पूर्वतयारीच करण्यात आलेली नव्हती. केंद्र सरकारने साधारण एप्रिल महिन्यात निधीला तत्त्वत: मंजुरी दिल्यावर राज्य शासनाकडून मंजुरी मिळण्यासाठी जुलै महिना उजाडला. या दरम्यान २६ जूनपासूनच रंगीबेरंगी कपड्यातील विद्यार्थ्यांच्या गर्दीने शाळा गजबजल्या.
अर्धा जुलै उलटल्यावर जेव्हा निधी आला, तेव्हा ९० टक्के विद्यार्थ्यांचे बँक खातेच नसल्याचा साक्षात्कार अधिकाºयांना झाला. मुख्याध्यापक, पालक विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी बँकांच्या पायºया झिजवून थकले. पण शिक्षण विभागातील अधिकारी गाफिलच राहिले.
विद्यार्थी करणार बनियान आंदोलन
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून आलेला ६ कोटींचा निधी पंचायत समिती स्तरावर पाठवून शिक्षण विभागातील अधिकारी मोकळे झाले आहेत. मात्र, किती विद्यार्थ्यांची गणवेश खरेदी आटोपली याचा आढावाच घेतला नाही. आता स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर केवळ किती खाती उघडण्यात आली, याची माहिती घेतली जात आहे. ६२ हजार विद्यार्थ्यांची खाती उघडल्याचा दावा शिक्षण विभाग करीत असला, तरी दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रश्न नजरेआड केला जात आहे. गणवेशाविना राष्ट्रीय एकात्मतेचे तत्त्वच बाजूला होत आहे. श्रीमंतांनी गणवेश घेतले. पण गरिबांची मुलं वंचित आहे. सरकार घटनेच्या १० मार्गदर्शक तत्त्वांनाच फाटा देत असल्याचा आरोप माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी केला. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊनही हालचाल दिसत नाही. त्यामुळे गणवेशाकरिता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घेऊन बनियान आंदोलन केले जाईल, असा इशारा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वास निकम यांनी दिला.