विक्रीकर निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: March 31, 2016 02:56 IST2016-03-31T02:56:34+5:302016-03-31T02:56:34+5:30
वाईन बार आणि रेस्टॉरंटसाठी विक्रीकर कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना येथील विक्रीकर ...

विक्रीकर निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
५०० रुपयांची लाच : वाईनबारला एनओसी
यवतमाळ : वाईन बार आणि रेस्टॉरंटसाठी विक्रीकर कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना येथील विक्रीकर कार्यालयातील विक्रीकर निरीक्षकाला बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
नरेंद्र रामभाऊ चाकोलेवार (४५) असे जाळ्यात अडकलेल्या विक्रीकर निरीक्षकाचे नाव आहे. यवतमाळ येथील एका व्यावसायिकाने वाईन बार आणि रेस्टॉरंटसाठी विक्रीकर कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र (क्लिअरन्स सर्टिफिकेट) मागितले. त्यासाठी चाकोलेवार यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यावरून संबंधित व्यावसायिकाने यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. बुधवारी विक्रीकर कार्यालयातच सापळा रचला. संबंधितांकडून ५०० रुपयांची लाच घेताना नरेंद्र चाकोलेवार यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, कर्मचारी अरुण गिरी, प्रकाश शेंडे, अमित जोशी, अमोल महल्ले, अनिल राजकुमार, नीलेश पखाले, गजानन राठोड, सुधाकर मेश्राम, धलवार यांनी केली.