जेनेरिक औषधांची जादा दराने विक्री
By Admin | Updated: June 20, 2017 01:23 IST2017-06-20T01:23:58+5:302017-06-20T01:23:58+5:30
औषधी दुकानांतून जेनेरिक औषधांची जादा दराने विक्री होत असून यातून गोरगरीब व सर्वसामान्य ग्राहकांची लूट होत आहे.

जेनेरिक औषधांची जादा दराने विक्री
पांढरकवडा येथे गोरगरिबांची लूट : अन्न व औषधी प्रशासनाचे व्यावसायिकांना अभय
बंडू कर्णेवार । लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : औषधी दुकानांतून जेनेरिक औषधांची जादा दराने विक्री होत असून यातून गोरगरीब व सर्वसामान्य ग्राहकांची लूट होत आहे. मात्र अन्न व औषधी प्रशासन जणू काही वैद्यकीय व्यावसायिकांच्या दावणीलाच बांधल्याचे रूग्णांकडून बोलले जात आहे.
गोरगरिबांना कमी दरात औषधी मिळावी, यासाठी विविध कंपन्या जेनेरीक औषधींचे उत्पादन करतात. विविध औषधी दुकानात किरकोळ औषध विक्रीसाठी जनरल काऊंटर चालविले जाते. अशा जनरल काऊंटरवरून जेनेरीक औषधीची विक्री केली जाते. या औषधी दुकानदार मात्र कमी दराने उचलतात व जादा दराने विक्री करून तिप्पट-चौपट रक्कम कमविली जात आहे. विविध मेडीकलमध्ये अशा जनरल काऊंटरवरून जेनेरीक औषधीमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, हिवताप, अशा आजारांसाठी औषध विक्री केल्या जाते. मात्र जेनेरीक औषधी असूनही नामांकित कंपनीप्रमाणेच दर आकारले जातात. यातून सर्वसामान्य औषधी अत्यल्प दराने घाऊक बाजारात उपलब्ध होत असून किरकोळ बाजारात जादा दराने विक्री करून मोठ्या प्रमाणात करचोरी करण्यात येत आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चक्क दिशाभूल होत असून औषधी दुकानचालक ग्राहकांना अशी उत्पादने विकून फसवणूक करीत आहे. सध्या पावसाळ्यास सुरूवात झाली असून रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. दवाखान्यात न जाता थेट औषधी दुकानातून औषधी घेऊन किरकोळ उपचार करून घेणारेही सर्वसामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणात असतात. अशा ग्राहकांच्या माथी जेनेरीक औषधी मारून दुकानचालक मोकळे होतात. किरकोळ आजारावर रामबाण इलाज होत असल्याची बतावणी करून रेकॉर्डवर नसलेल्या औषधी विकून करचोरी करण्यात येत आहे. आदिवासीबहुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण जनता शहरात येऊन औषधी खरेदी करतात. त्यांची अशा प्रकारे हेळसांड होत आहे. शहरातील एखाद्या औषधी दुकानाची तपासणी करण्यात आल्याचे अद्याप पाहण्यात अथवा ऐकण्यात आले नाही. यावरून अन्न व औषधी प्रशासन विभाग किती जागरूक आहे, याची प्रचिती येते. जेनेरीक औषधी विक्रीचा हा गोरखधंदा बंद करण्यासाठी औषधींची ज्यादा दराने विक्री थांबवून हा गोरखंधदा बंद करावा, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
जेनेरिक औषधांची संगणकात नोंदच नाही
विशेष म्हणजे शहरातील अनेक औषधी दुकानांमधील संगणकांमध्ये या औषधी उत्पादनांची नोंदही करण्यात आली नसल्याची माहिती आहे. जेनेरीक औषधी मोठ्या प्रमाणात खरेदी करून परस्पर विक्री करून दररोज हजारो रूपयांची वरकमाई करण्यात येत आहे.