आयुर्वेदिकच्या नावाने अँलाेपॅथी औषधांची विक्री, गुन्हा दाखल; यवतमाळच्या दिग्रसमधील प्रकार
By सुरेंद्र राऊत | Updated: December 27, 2025 18:05 IST2025-12-27T17:59:09+5:302025-12-27T18:05:40+5:30
प्रयाेगशाळा अहवालानंतर FDAची कारवाई

आयुर्वेदिकच्या नावाने अँलाेपॅथी औषधांची विक्री, गुन्हा दाखल; यवतमाळच्या दिग्रसमधील प्रकार
सुरेंद्र राऊत, यवतमाळ: आयुर्वेदिक औषधी असल्याचे सांगून ग्राहकांच्या माथी ॲलाेपॅथीचे घटक असणारे औषध मारले जात आहे. अशा प्रकाराच्या बनावट औषधांचा सुळसुळाट झाला आहे. अधिक नफ्याच्या हव्यासापाेटी परवानाधारक औषधी दुकानातून याची सर्रास विक्री सुरू आहे. दिग्रस येथील एका प्रकरणात प्रयाेगशाळेच्या अहवालावरून औषधी विक्रेत्याविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मे महिन्यात घेतलेले आयुर्वेदिक औषधी नमुन्याचा अहवाल आता प्राप्त झाला. त्यावरून शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
दिग्रस शहरातील नामांकित महावीर मेडिकल ॲंड जनरल स्टाेअर्समधून ‘ह्यदयम’ नावाचे आयुर्वेदिक औषध विकले जात हाेते. औषधी निरीक्षकांनी मे २०२५ मध्ये याचे नमुने घेऊन प्रयाेगशाळेत पाठविले. तपासणीमध्ये वेदनाशामक औषधात ॲलाेपॅथीचे घटक आढळून आले. औषधी विक्रेते नयन नविचंद गड्डा यांना औषधीच्या पुरवठादाराबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. सुरुवातील फ्लिप कार्टवरून औषधी मागविल्याचे सांगितले, मात्र त्याचे अधिकृत देयक दिले नाही, फ्लिप कार्ट कंपनीनेही या औषधीचा पुरवठा करत नसल्याचे एफडीएकडे स्पष्ट केले. औषधीचा उत्पादक काेण, वितरक काेण, याची माहिती गड्डा यांनी जाणीपूर्वक लपून ठेवली. त्यामुळे या प्रकरणात औषधी निरीक्षक मनीष गाेतमारे यांच्या तक्रारीवरून दिग्रस पाेलिसांनी कलम ३१८, २७६, २७७ भारतीय न्यायसंहितेनुसार सहकलम औषधे व साैंदर्य प्रसाधने कायद्यातील नियम १९४५ चे कलम १८ (क), १८(अ), २२, ३३ ईईए १६ नुसार गुन्हा दाखल केला.
पाकिस्तानातील औषध आले कुठून?
पाढंरकवडा येथे एका औषधी दुकानात मेड-इन पाकिस्तान असलेल्या साैंदर्य प्रसाधानाचा साठा सापडला. ही साैंदर्य प्रसाधने आली काेठून याचा सुगावा लागला नाही. संबंधित विक्रेत्याने हैद्राबादे येथील उत्पादकाचा पत्ता दिला हाेता. त्या नावाने काेणताच उत्पादक नसल्याचे पुढे आले आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये सर्रास ॲलाेपॅथीचे घटक वापरले जातात. अधिक नफ्यासाठी औषधी विक्रेते ग्राहकांची फसवणूक करतात. १०० टक्के अयुर्वेदिक सांगून अशा औषधीची विक्री केली जाते.
आयुर्वेदिक प्राेडक्ट घेताना राहा सतर्क
आयुर्वेदिक औषधांचा दुष्परिणाम हाेत नाही, डाॅक्टरच्या सल्ल्याने घेण्याची गरज नाही, असा एक गैरसमज पसरला आहे. एखाद्याच्या अनुभावावरून, सांगण्यावरून आयुर्वेदिक औषधांचे सेवन केले जाते. मुळात ही औषधी खरच आयुर्वेदिक आहे का, याची खातरजमा हाेत नाही. विक्रेता केवळ त्याचा नफा पाहून अशी औषधी रुग्णांना देत आहे. त्यामुळे काही दिवसांनंतर याचे गंभीर परिणाम हाेऊ शकतात. हा धाेका ओळखूनच प्रत्येक व्यक्तीने आयुर्वेदिक व इतर कुठेलेही औषध तपासून व अधिकृत स्टाेअर्समधून खरेदी करावे, असे आवाहन औषधी निरीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे.