यवतमाळ जिल्ह्यातील साक्षी मस्केची भारतीय वेटलिफ्टिंग संघात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 21:31 IST2019-05-29T21:30:52+5:302019-05-29T21:31:29+5:30
पुसदच्या श्रीरामपूरमधील साक्षी प्रकाश मस्के हिची भारतीय वेटलिफ्टिंग संघात निवड झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील साक्षी मस्केची भारतीय वेटलिफ्टिंग संघात निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुसदच्या श्रीरामपूरमधील साक्षी प्रकाश मस्के हिची भारतीय वेटलिफ्टिंग संघात निवड झाली आहे. आफ्रिका खंडातील सामोआ देशात ८ ते १४ जुलै दरम्यान होणाऱ्या कॉमन वेल्थ ज्युनिअर अँड यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ती ४५ किलो वजनगटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. पंजाबच्या पटियाला येथील भारतीय संघाच्या वेटलिफ्टिंग सराव शिबिरात ती सहभागी झाली आहे. इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सहदेव यादव यांनी तिच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेला दिले आहे.
साक्षी मस्के हिची याच वर्षी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये वेटलिफ्टिंगसाठी निवड झाली आहे. तेथे ती बारावीचे शिक्षण घेत आहे. पुसदच्या गुणवंतराव देशमुख विद्यालयातून तिने आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तिच्या वडिलांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. गुणवंतराव देशमुख विद्यालयाचे शारीरिक शिक्षक अविनाश कराळे, आनंद हेल्थ क्लबचे प्रशिक्षक गोपाल चव्हाण, आनंद करडे, रोशन देशमुख आणि पुणे क्रीडा प्रबोधिनीच्या माने यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.