विदर्भाचा नायगारा असलेला सहस्रकुंड धबधबा उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:43 AM2021-07-27T04:43:57+5:302021-07-27T04:43:57+5:30

अविनाश खंदारे उमरखेड : विदर्भाचा नायगारा अशी ओळख असलेला पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा विकासापासून वंचित आहे. उमरखेड तालुक्यातील या ...

The Sahasrakund waterfall with the Niagara of Vidarbha is neglected | विदर्भाचा नायगारा असलेला सहस्रकुंड धबधबा उपेक्षित

विदर्भाचा नायगारा असलेला सहस्रकुंड धबधबा उपेक्षित

Next

अविनाश खंदारे

उमरखेड : विदर्भाचा नायगारा अशी ओळख असलेला पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा विकासापासून वंचित आहे. उमरखेड तालुक्यातील या भागात निर्सगरम्य परिरसर आहे. मात्र, विकासाअभावी हा संपूर्ण परिसर भकास ठरला आहे.

मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर हा धबधबा आहे. परिसर वैभवसंपन्न आणि मनमोहक आहे. लगतच पैनगंगा अभयारण्य आहे. या परिसरात विपुल वनराई, हिरवागार निसर्ग, वनश्रीने भरगच्च डोंगरमाथे व दर्‍या आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी कोसळणारे धबधबे दिसतात. हे सारे दृश्य मनाला खूप सुखद वाटते. मात्र, ज्यावेळी पर्यटक सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी येतात, त्यावेळी संपूर्णपणे पर्यटकांचा हिरमोड होतो.

धबधबा अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेला हा धबधबा आणि परिसराची अवस्था दयनीय झाली आहे. तेथील बागेत कचरा, तणकट, गाजर गवत वाढले आहे. पर्यटकांसाठी असणाऱ्या सुरक्षा छतांची अवस्था स्मशानभूमीसारखी झाली आहे. केवळ अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या ओल्या पार्टीसाठीच हे ठिकाण बनले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामान्य पर्यटकांना शासकीय विश्रामगृहात प्रवेश नाकारला जातो.

महिलांसाठी कुठेही स्वच्छतागृह नाही. कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. बसण्याची सुविधा नाही. धबधबा पाहणे आणि परत जाणे, एवढेच पर्यटकांच्या नशिबी उरले आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सहस्रकुंड उपेक्षित आहे. या बंदी भागातील गाव, खेड्यांचा विकासही खुंटला आहे. परिणामी पर्यटक मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर संकुल पर्यटन स्थळाकडे धाव घेत आहे. विपुल वनसंपदा, निसर्गरम्य परिसर असूनही तालुक्यातील सहस्त्रकुंड परिसर उपेक्षित आहे. सहस्रकुंड धबधबा आणि पैनगंगा अभयारण्य परिसराचा विकास केल्यास स्थानिकांना रोजगारही मिळण्याची शक्यता आहे.

बॉक्स

तालुक्यातील ढाणकी ते सहस्त्रकुंडचे अंतर २५ कीलोमीटर आहे. मात्र, रस्त्यांची दुरवस्था झाल्याने हे अंतर कापण्यासाठी तबब्ल तीन तास लागतात. त्यात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्यावरील खड्डे चुकविताना चालकाला कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे की अपघात घडेल याचा नेम नसतो. सहस्त्रकुंड धबधबा बंदी भागातील गावांना जोडणारा दुवा आहे. मात्र, रस्ते कधी सुधारणार? असा प्रश्न आहे.

Web Title: The Sahasrakund waterfall with the Niagara of Vidarbha is neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.