ग्रामीण रूग्णालयच झाले गंभीर आजारी
By Admin | Updated: June 23, 2014 00:21 IST2014-06-23T00:21:37+5:302014-06-23T00:21:37+5:30
आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयच आजारी पडल्याचा प्रत्यय रूग्णालयातील समस्या बघून येत आहे. रुग्णांवर उपचार करण्याऐवजी आता या रुग्णालयालाच सलाईन देण्याची

ग्रामीण रूग्णालयच झाले गंभीर आजारी
इंजेक्शनचा तुटवडा : स्वच्छतेचा अभाव, अनेक पदे रिक्तच
मारेगाव : आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयच आजारी पडल्याचा प्रत्यय रूग्णालयातील समस्या बघून येत आहे. रुग्णांवर उपचार करण्याऐवजी आता या रुग्णालयालाच सलाईन देण्याची गरज निर्माण झाली आहे.
आरोग्य सेवा उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, रूग्ण कल्याण समिती व येथे कार्यरत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयाकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. वारंवार प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणाने व वेळकाढू धोरणाने येथील आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला आहे. वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा या रूग्णालयातील समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे़ एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी येथे रूजू झाल्याबरोबर रूग्णालयाची खस्ता हालत बघून कपाळावर हात मारून घेण्याची शक्यता आहे.
या ग्रामीण रूग्णालयात गेल्या १५ दिवसांपासून पाण्याचा तुटवडा असल्याने शौचालये नियमित साफ न केल्याने रुग्णालयातच दुर्गंधी पसरली अहे. तीन दिवसांपूर्वी प्रस्तुत प्रतिनिधीने दुपारी काही राजकीय नेत्यांसह या रूग्णालयाला भेट दिली असता, वॉर्डातील दाखल रूग्ण दुर्गंधीने त्रस्त झालेले आढळून आले.
याबाबत येथे कार्यरत डॉग़ोेटे यांना विचारले असता, त्यांनी गेल्या १५ दिवसांपासून पाण्याचे टाके लिकेज असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. दुरूस्तीचे पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिले असून बाहेरील नळाचे पाणी आणून स्वीपर शौचालये साफ करीत असल्याचे त्यांनी सांगितले़ त्या दिवशी रूग्ण कक्षासह दवाखान्यात सर्वत्र अस्वच्छता दिसून आली़ त्यामुळे रूग्णालयातील स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले. हे रुग्णालयच आता गंभीर आजारी पडल्याने प्रथम त्याच्यावर उपचार आवश्यक आहे.(तालुका प्रतिनिधी)