ग्रामविकासाची कामे ठप्प
By Admin | Updated: November 24, 2014 23:07 IST2014-11-24T23:07:10+5:302014-11-24T23:07:10+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. आता जवळपास एक महिना या आंदोलनाला पूर्ण होत आला आहे. ग्रामसेवकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने

ग्रामविकासाची कामे ठप्प
राळेगाव : यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. आता जवळपास एक महिना या आंदोलनाला पूर्ण होत आला आहे. ग्रामसेवकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने अद्यापही हे आंदोलन संपलेले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बहिष्कार टाकून ग्रामसेवकांनी हे असहकार आंदोलन पुढे रेटत नेले आहे. या आंदोलनामुळे ग्रामविकासाची कामे मात्र ठप्प झाली आहे.
ग्रामसेवकांची त्यांच्या ग्रामपंचायतस्तरावरील दैनंदिन कामे सुरू आहेत. पण जिल्हा परिषदस्तरावर, पंचायत समितीस्तरावर होणाऱ्या बैठकांत, शासन व जनप्रतिनिधींच्या विविध योजना, कार्यक्रम राबविणे, सूचना देणे, सुरू असलेल्या तथा पूर्ण झालेल्या कामाचा आढावा घेणे आदी बाबी थांबल्या आहेत.
सप्टेंबर, आॅक्टोबर महिना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत गेला. त्यानंतर दिवाळी झाली. दिवाळीनंतरच्या दोन आठवड्यात अनेक शासकीय सुट्या आल्या. त्यानंतर ग्राम विकासासंदर्भातील विविध कामांचा वेग वाढेल, अशी अपेक्षा असताना ग्रामसेवकांचे बहिष्कार व असहकार आंदोलन सुरू झाले. ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. चर्चेत काही मागण्या मान्य करण्यात आल्या. पण इतर मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही.
ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकाऱ्यांवर सेवा काळात कोणताही कसूर, चूक, तक्रारीवर लगेच निलंबनासारखी कडक कारवाई केली जाते. पण त्यांच्या हिताच्या मागण्या पाच-पाच वर्षे सोडविल्या जात नाही. संबंधितांकडून वारंवार टोलवाटोलवी केली जाते, असा आरोप संघटनेकडून होत आहे. आताही ग्रामसेवकांनी प्रथम आंदोलन मागे घ्यावे, त्यानंतर इतर मागण्यांवर विचार करू, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. यात तडजोड झाली नसल्याने हे असहकार आंदोलन पुढे चिघळू नये, यासाठी दोनही बाजूंनी दोन पावले समोर जाण्याची गरज आहे.
नागरिकांच्या वैयक्तिक विकासाच्या, हिताच्या योजना, ग्रामपंचायतीच्या भौतिक, सार्वजनिक विकासाच्या योजना राबविण्याच्या आणि त्या पूर्ण करण्याचा हाच अत्यंत महत्त्वपूर्ण कालावधी आहे. मात्र यासाठी दोनही बाजूंनी लवचिकता दाखवून आंदोलन आटोपते घेण्याच्यादृष्टीने प्रयत्नांची गरज आहे. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे अपेक्षित असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष एम.डी. मस्के यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)