ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: June 25, 2014 00:40 IST2014-06-25T00:40:55+5:302014-06-25T00:40:55+5:30
रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूरांच्या हजेरी पटावर स्वाक्षरी करण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच घेताना एका ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले.

ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
ढाणकी : स्वाक्षरीसाठी पैशाची मागणी
कुपटी (उमरखेड) : रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूरांच्या हजेरी पटावर स्वाक्षरी करण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच घेताना एका ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ढाणकी ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी दुपारी केली.
जयवंत शंकर आंडगे रा. उमरखेड असे लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. ढाणकी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत एका शेतात वैयक्तीक सिंचन विहीरीचे खोदकाम सुरू आहे. या कामावर स्थानिक रोहयो मजुरांनी काम केले. त्यावरून मजुरांच्या उपस्थितीचे हजेरीपट तयार करण्यात आले. त्याची तपासणी करण्याचे काम ग्रामविकास अधिकारी जयवंत शंकर आंडगे यांच्याकडे होते. त्यानुसार हजेरीपटाची तपासणीही त्यांनी केली. मात्र त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी शेतकऱ्याला दोन हजार रूपयांची मागणी केली. त्याला होकार दिल्यानंतर यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांनी पंच देवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी ढाणकी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला.
ग्रामविकास अधिकारी आंडगे यांनी लाचेची रक्कम स्विकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. कारवाईत एसीबीचे कर्मचारी सुशिल जोशी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, सुधाकर कोकेवार, गजानन राठोड, अमोल महल्ले, निलेश पखाले, अरूण गिरी, शैलेश ढोणे, अमीत जोशी, अनिल राजकुमार, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर आदींनी सहभाग घेतला होता. (वार्ताहर)