क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आरटीओ करणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 22:09 IST2022-10-11T22:08:34+5:302022-10-11T22:09:46+5:30
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी किती प्रवासी घ्यावेत याचे नियम आहेत. वाहन चालकांची नियमित तपासणी बंधनकारक आहे, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना आरटीओंना दिल्या आहेत. याबरोबरच वाहन सुस्थितीत आहे का, याची पडताळणीही नियमित करायला सांगितली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे नियमबाह्य आहे. कंपनीच्या परस्पर चालकांनी ट्रॅव्हल्समध्ये अतिरिक्त प्रवासी घेतले, असे सांगून कंपनीला जबाबदारी टाळता येणार नाही.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आरटीओ करणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशिकजवळ भीषण अपघात होऊन १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. हे पुढे आले आहे. चालक परस्पर प्रवासी घेतात, असे म्हणून ट्रॅव्हल्स कंपनीला आपली जबाबदारी टाळता येणार नाही, या प्रकरणात आरटीओतर्फे नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी किती प्रवासी घ्यावेत याचे नियम आहेत. वाहन चालकांची नियमित तपासणी बंधनकारक आहे, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना आरटीओंना दिल्या आहेत. याबरोबरच वाहन सुस्थितीत आहे का, याची पडताळणीही नियमित करायला सांगितली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे नियमबाह्य आहे. कंपनीच्या परस्पर चालकांनी ट्रॅव्हल्समध्ये अतिरिक्त प्रवासी घेतले, असे सांगून कंपनीला जबाबदारी टाळता येणार नाही. या प्रकरणातही या अनुषंगाने योग्य ते कार्यवाई करण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील खासगी प्रवासी वाहतुकीच्या ट्रॅव्हल्स पॉइंटसाठी शहराबाहेर पर्यायी जागा बघण्यासाठी सांगितले होते. ही जागा शहरापासून जवळ असावी, तसेच सुरक्षित ठिकाणी असावी, अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगरपालिका आणि पोलीस विभागाला दिल्या होत्या. मात्र, अशी जागा उपलब्ध नसल्याचे आरटीओ कार्यालयाकडून कळविण्यात आले. त्यानंतर सध्याच्या ट्रॅव्हल्स पॉईंट ठिकाणची गाड्यांची गर्दी कमी झाली आहे. गाड्या आता मागील बाजूला लावल्या जात आहेत, असे आरटीओतर्फे सांगण्यात आले. मात्र, ट्रॅव्हल्सला नुकत्याच झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने ट्रॅव्हल्स पॉइंटसाठी पुन्हा नव्याने जागा शोधण्यास सांगण्यात येईल. ट्रॅव्हल्समुळे सध्याच्या ठिकाणी दुर्घटना होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश आरटीओंना दिले असून, काही दुर्घटना झाल्यास या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई
- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळावी, या दृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याद्या बनविण्याच्या कामावर सुरुवातीला तलाठ्यांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी विरोधाची भूमिका घेतली. संबंधित ग्रामसेवकांशी मुख्य कार्यकारी अधिकारी संवाद साधत आहे. तर कृषी सहायकांच्या प्रश्नात लक्ष घालण्याच्या सूचना कृषी अधीक्षकांना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.