आरटीओच्या पिंपळखुटी चेक पोस्टवर १०८ खासगी कर्मचारी
By Admin | Updated: April 2, 2016 02:53 IST2016-04-02T02:53:30+5:302016-04-02T02:53:30+5:30
आरटीओच्या महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सीमेवरील पिंपळखुटी चेक पोस्टवर ‘वसुली’साठी तब्बल १०८ खासगी कर्मचारी नियुक्त आहेत.

आरटीओच्या पिंपळखुटी चेक पोस्टवर १०८ खासगी कर्मचारी
हस्तलिखित पावत्या : आठ तासात तब्बल अडीच लाखांचा ‘गल्ला’
सुरेंद्र राऊत यवतमाळ
आरटीओच्या महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सीमेवरील पिंपळखुटी चेक पोस्टवर ‘वसुली’साठी तब्बल १०८ खासगी कर्मचारी नियुक्त आहेत. या वसुलीतून प्रत्येक आठ तासाच्या शिप्टमध्ये तब्बल अडीच लाख रुपयांचा ‘गल्ला’ गोळा केला जात असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.
पिंपळखुटी चेक पोस्टवर नुकतीच परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी भेट दिली. त्यांना ‘आलबेल’ दाखविले गेले असले तरी प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळेच पुढे आले. पिंपळखुटी चेक पोस्ट अद्यावत पद्धतीने तयार केले आहे. तेथे प्रत्येक वाहनाचे वजन करून रितसर पावती देणे बंधनकारक आहे. तेथे संगणकीकृत पावती देण्याची व्यवस्था केली गेली आहे. आरटीओच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित कक्ष तयार आहे. वाहन तपासणीवर अधिकाऱ्यांना बसल्या जागी नियंत्रण ठेवता यावे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. काही मीटर अंतरापर्यंत या कॅमेरांचा वॉच असतो. परंतु प्रत्यक्षात या कॅमेरांपासून दूर जाऊन या चेक पोस्टची ‘वसुली’ केली जाते. कॅमेरात कैद होऊ नये म्हणून वसुलीचा कारभार सुमारे अर्धा किलोमीटर दूर हलविण्यात आला आहे. या वसुलीसाठी तेथे एक-दोन नव्हे तर तब्बल १०८ खासगी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. प्रत्येकी आठ तासाच्या ड्युटी शिप्टमध्ये या कर्मचाऱ्यांकडून वसुली करून घेतली जाते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाल्यास रंगेहात सापडू नये, म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी खासगी कर्मचारी नेमण्याची ही खास सतर्कता बाळगली आहे. हे कर्मचारी संगणकात एन्ट्री करण्याऐवजी वाहनधारकांना हस्तलिखित पावत्या देतात. त्याचा कुठेच हिेशेब शासन स्तरावर दाखविला जात नाही.
औरंगाबाद येथील मुन्ना, मुंबईचा सलीम, यवतमाळचा नीलेश, अमरावतीचा राजू हे चौघे या १०८ कर्मचाऱ्यांचे म्होरके आहेत. त्यांच्या हाताखाली प्रमुख ३० कर्मचारी आणि या ३० जणांच्या हाताखाली दंडेधारी ७० कर्मचारी चेक पोस्टवर कार्यरत आहे. हस्तलिखित पावत्यांद्वारे होणाऱ्या या वसुलीतील २४ तासाची उलाढाल तब्बल सात लाख ५० हजार रुपयांची आहे. या मासिक वसुलीतून ३९ लाख रुपयांचे वाटप हे राजकीय पुढारी, कार्यकर्ते, माध्यमांपर्यंत केले जाते.
उर्वरित रक्कम ही आरटीओतील यंत्रणा आपल्या पदाच्या दर्जानुसार आपसात वाटून घेत असल्याचे सांगण्यात येते. या वसुलीतून येथे कार्यरत खासगी कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमविली आहे. खासगी कर्मचाऱ्यांची ही ‘उलाढाल’ पाहता आरटीओच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकडा किती मोठा असेल याचा सहज अंदाज येतो.
या चेक पोस्टवरून जनावरांचे मांस, गुटखा, अफु-चरस-गांजा व अन्य अवैध मालाची मोठ्या प्रमाणात ने-आण होते. चेक पोस्टच्या मेहरबानीतूनच ही पासिंग केली जाते. पिंपळखुटी चेक पोस्टवर महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ होत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे एकही ट्रॅप यशस्वी करू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते. या विभागाकडून प्रत्येक वेळी तक्रार नाही, असे कारण पुढे केले जाते. वास्तविक या विभागाचा कर्मचारी एखाद्या वाहनात बसून गेला तरी चेक पोस्टवरील यंत्रणेला अवैध वसुली करताना रंगेहात पकडणे सहज शक्य आहे.
मोटर वाहन निरीक्षकांमध्ये मासिक वर्णीसाठी रस्सीखेच
पिंपळखुटी चेक पोस्टसाठी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे स्वतंत्र पद मंजूर आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षात हे पद तेथे भरले गेले नाही. कुण्यातरी वाहन निरीक्षकाकडे या पदाचा अतिरिक्त प्रभार दिला जातो. चेक पोस्टसाठी प्रत्येक महिन्याला अमरावतीहून चार, यवतमाळातून दोन तर अकोल्यातून एका वाहन निरीक्षकाची नियुक्ती केली जाते. महिनाभरासाठी नियुक्ती असल्याने हे अधिकारी वाटेल त्या मार्गाने ‘गल्ला’ भरतात. तेथे वर्णी लावून घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. या चेक पोस्टवर लिपिकवर्गीय यंत्रणेची वार्षिक नियुक्ती केली जाते. त्यात अमरावती-यवतमाळातून प्रत्येकी दोन तर एक लिपिक अकोल्यातून नेमला जातो.