रोहयो कंत्राटदार शिरले जंगलात
By Admin | Updated: April 10, 2015 00:11 IST2015-04-10T00:11:13+5:302015-04-10T00:11:13+5:30
पांढरकवडा वन प्रशासनाच्या ताठर भूमिकेमुळे तेथील रोजगार हमी योजना आणि जिल्हा नियोजन निधीवर जगणाऱ्या कंत्राटदारांची कोंडी झाली आहे.

रोहयो कंत्राटदार शिरले जंगलात
लोकमत विशेष
यवतमाळ : पांढरकवडा वन प्रशासनाच्या ताठर भूमिकेमुळे तेथील रोजगार हमी योजना आणि जिल्हा नियोजन निधीवर जगणाऱ्या कंत्राटदारांची कोंडी झाली आहे. अखेर या कंत्राटदारांनी जंगलात एन्ट्री केली असून तेथे बेसुमार सागवान वृक्षतोड केली जात आहे. हे चोरीतील सागवान लगतच्या तेलंगणा-आंध्र प्रदेशात तस्करीद्वारे पाठविले जात आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील बोगस कामांमुळे पांढरकवडा वनविभागाची ‘ख्याती’ मुंबई-दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. तत्कालीन डीएफओ आणि त्यांचे अधिनस्त एसीएफ, आरएफओ, वनपाल, वनरक्षक ही यंत्रणा त्यासाठी जबाबदार आहे. त्यांना महसूल व डाक विभागाच्या यंत्रणेचाही हातभार लागला. त्यानंतर पांढरकवडा वनविभागाची सूत्रे उपवनसंरक्षक गिऱ्हेपुंजे यांच्याकडे सोपविली गेली. त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात प्रशासकीय ताठरता कायम ठेवली. रोजगार हमी योजना आणि जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधीतून गिऱ्हेपुंजे यांनी जंगलात पाणलोटची कामे घेणे बंद केले. त्याऐवजी त्यांनी वनीकरण व कुपाच्या कामावर भर दिला. पाणलोटच्या कामात मोठा मलिदा मिळत असल्याने कंत्राटदारांच्या उड्या पडत होत्या. मात्र ती कामेच बंद झाल्याने हे कंत्राटदार जणू बेरोजगार झाले. गिऱ्हेपुंजे यांच्या बदलीनंतर तरी नव्या अधिकाऱ्याला आपण पाणलोट कामांसाठी मॅनेज करू, असा या कंत्राटदारांचा मनसुबा होता. मात्र गिऱ्हेपुंजे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर आलेले नवे आयएफएस अधिकारीसुद्धा ताठर असल्याने या कंत्राटदारांची कोंडी आणखी वाढली. म्हणून या कंत्राटदारांनी आता सागवान तस्करीवर लक्ष केंद्रीत केले.
झरी, पांढरकवडा, उमरी वन क्षेत्रातील हे बहुचर्चित पांढरपेशे कंत्राटदार आता जंगलात शिरले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात सागवान तोड चालविली आहे. कनिष्ठ वन यंत्रणेशी संगनमत करून सागवान तोड व तस्करी सुरू आहे. हे कंत्राटदार केवळ पांढरकवडाच नव्हे तर यवतमाळ वनविभागातही आपली ‘कामगिरी’ बजावत आहे. वडगाव (जंगल) वन परिक्षेत्रातील वाकी दुधाना, येळाबारा या सर्कलमध्ये वन खात्याने सहा ते सात मीटर सागवान जप्त केले. या सागवानावरील हातोडे संशयास्पद आहे. वनपाल व सहायक वनसंरक्षकाने हे हातोडे लावल्याचे दिसून येते. हातोडे वडगाव वनपरिक्षेत्रातील आणि ट्रान्सपोर्ट पास पांढरकवड्याची असा उफराटा कारभार पुढे आला आहे. घाटंजी, जोडमोहा, अकोलाबाजार या भागात ही वृक्षतोड केली जात आहे. त्याची मोठी साखळीच निर्माण झाली आहे. पुसद वनविभागातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्यासाठी वनखात्यातील अधिकाऱ्यांची सागवान तस्करांशी असलेली मिलीभगत कारणीभूत ठरली आहे. यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांच्यासाठी तीनही वनपरिक्षेत्रातील ही वृक्षतोड आव्हान ठरली आहे. जिल्ह्यातील दोन डीएफओ ‘नॉन करप्ट’ आहेत. मात्र त्यांच्या अधिनस्त यंत्रणेतील बहुतांश जण ‘मोस्ट करप्ट’ असल्याने कारवाईत आणि सागवान तोड व तस्करी रोखण्यात अपयश येत आहे. (प्रतिनिधी)