पुसद शहरात रस्त्यांची चाळणी
By Admin | Updated: July 8, 2017 00:33 IST2017-07-08T00:33:45+5:302017-07-08T00:33:45+5:30
राज्याला दोन मुख्यमंत्री आणि सातत्याने मंत्री देणाऱ्या पुसद शहरातील रस्त्यांची अवस्था एखाद्या खेड्यालाही लाजवेल अशी झाली आहे.

पुसद शहरात रस्त्यांची चाळणी
नगरपरिषदेचे दुर्लक्ष : नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : राज्याला दोन मुख्यमंत्री आणि सातत्याने मंत्री देणाऱ्या पुसद शहरातील रस्त्यांची अवस्था एखाद्या खेड्यालाही लाजवेल अशी झाली आहे. शहरातील रस्त्यांची चाळणी झाली असून अनेक रस्त्यांवर पाऊस आला की तळे साचते. रस्त्यावरून जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असून नगरपरिषद मात्र दुर्लक्ष करीत आहेत.
पुसद शहर राजकीयदृष्ट्या जागरूक शहर म्हणून ओळखले जाते. शहराने तब्बल दोन मुख्यमंत्री राज्याला दिले. अनेक वर्ष पुसदने मंत्रिपद भूषविले. आता त्याच घराण्यातील व्यक्ती पुसदच्या नगराध्यक्षपदी विराजमान आहे. परंतु शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे. नाईक चौक ते मुखरे चौकादरम्यान रस्त्यावर तुकारामबापू वॉर्डानजीक मोठ्ठाले खड्डे पडले आहे. येथील नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. नाली नसल्याने संपूर्ण पाणी रस्त्यावर साचते. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप येते. शहरातील तहसील कार्यालय, नगरपरिषद, पोस्ट आॅफिस, शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ, शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी हाच मार्ग आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. परंतु खड्डे बुजविण्याचे सौजन्य नगरपरिषदेने दाखविले नाही. वारंवार अपघात घडत असून अनेकांना ईजाही होत आहे.
येथील दूरदर्शन केंद्र ते तीन पुतळा परिसरात मोठ्ठाले खड्डे पडले आहे. येथेही अपघाताची शक्यता वाढली आहे. जाजू हॉस्पिटल ते शंकरनगर, रामनगरकडे जाणारा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. लहानसहान खड्डे चुकविले जावू शकते. परंतु काही भागात दीड-दीड फुटांचे खड्डे पडले आहे. यात पाणी साचल्यानंतर रात्री वाहनधारकाला खड्डा दिसत नाही.