संततधार पावसाने नदी-नाले तुडूंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:33 IST2019-07-30T21:33:01+5:302019-07-30T21:33:38+5:30
बहुप्रतिक्षीत दमदार पावसाचे अखेर सोमवारी वणी उपविभागात आगमन झाले. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. सोमवारी दुपारपासून बरसत असलेल्या या पावसामुळे मंगळवारी वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा या चारही तालुक्यात पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे.

संततधार पावसाने नदी-नाले तुडूंब
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : बहुप्रतिक्षीत दमदार पावसाचे अखेर सोमवारी वणी उपविभागात आगमन झाले. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. सोमवारी दुपारपासून बरसत असलेल्या या पावसामुळे मंगळवारी वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा या चारही तालुक्यात पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. पुरामुळे पांढरकवडा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या अनेक वर्षानंतर यावर्षी या भागात पावसाने विलंबाने हजेरी लावली. ७ जूनला मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. त्यानंतर एक ते दोनवेळा पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकवून टाकल्या. परंतु हवामान खात्याचा अंदाज चुकला. पावसाने कायमच दडी मारली. परिणामी कपाशी, सोयाबीन, तूर, आदी पिके धोक्यात आली. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नसता, तर ही पिके करपली असती. परंतु गुरूवारपासून अधुनमधून या भागात पाऊस येऊ लागला. त्यामुुुुळे शेतकरी सुखावला. मात्र सोमवारी दुपारपासून पावसाचा चांगलाच जोर वाढला. गेल्या २४ तासापासून वणी, झरी, मारेगाव व पांढरकवडा या तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील खुनी नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच या परिसरातील मांडवी, पिवरडोल, गवारा, माथार्जुन या गावांचा संपर्क तुटला आहे. वाऱ्हा या गावापासून कवठा या गावाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी असल्याने या दोनही गावांचा संपर्क तुटला आहे. सोमवारी दुपारपर्यंत कोरडी असलेली निर्गुडा नदीदेखील संततधार पावसाने दुथडी भरून वाहत आहे. वणी, मारेगाव, पांढरकवडा व झरी या चारही तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. अनेक शेतातदेखील पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले होते.