पैनगंगेचा पूलही खचण्याचा धोका

By Admin | Updated: November 9, 2014 22:34 IST2014-11-09T22:34:16+5:302014-11-09T22:34:16+5:30

विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील धनोडा येथील पुलाच्या जवळच वाळूचा बेसुमार उपसा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तस्करांनी चक्क पुलाच्या पिल्लरजवळच वाळूसाठी मोठ्ठाले खड्डे खोदले आहे.

The risk of expending the pool of Panganga | पैनगंगेचा पूलही खचण्याचा धोका

पैनगंगेचा पूलही खचण्याचा धोका

बेसुमार वाळू उपसा : धनोडा येथे पिल्लरजवळच मोठमोठे खड्डे
रितेश पुरोहित - महागाव
विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील धनोडा येथील पुलाच्या जवळच वाळूचा बेसुमार उपसा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तस्करांनी चक्क पुलाच्या पिल्लरजवळच वाळूसाठी मोठ्ठाले खड्डे खोदले आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरीवरील पुलासारखी अवस्था या पुलाचीही होण्याची भीती निर्माण झाली आहे.
महागाव तालुक्यातील धनोडा येथून पैनगंगा उत्तरवाहिनी वाहते. विशाल पात्र असलेल्या या पैनगंगेत मोठ्या प्रमाणात दर्जेदार रेती आहे. या रेतीवर गेल्या कित्येक वर्षांपासून तस्करांचा डोळा आहे. लिलावातील अटी-शर्तीचा भंग करून कंत्राटदार मनमानी पद्धतीने बेसुमार वाळूचा उपसा करतात. याचा फटका आता पैनगंगेवरील पुलाला बसण्याची भीती निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीवर पुलासाठी १९५८ साली पायाभरणी करण्यात आली. तर १९६२ साली या पुलाचे उद्घाटन झाले. १६ गाळे असलेल्या या पुलाची लांबी ६५० फूट असून रुंदी ३६ फूट आहे. तसेच नदी पात्रापासून पूल ४० मीटर उंच आहे. विशालकाय पूल दगडी चिऱ्यात बांधला असून त्यावेळी सात लाख ३६ हजार ३६५ रुपये खर्च या पुलावर करण्यात आला होता.
पैनगंगा नदीत पूस, शीप आणि गरुड गंगा या तीन नद्या येऊन मिसळतात. त्याचे पाणी या पुलाखालूनच वाहून जाते. पैनगंगेचे पात्र विशाल असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात रेती आहे. या रेती घाटावरून वाळू उपशासाठी प्रचंड स्पर्धा दिसून येते. दररोज ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक होते. मनुष्यबळ आणि जेसीबीच्या सहाय्याने नदी पात्रातून वाळू उपसली जाते. मात्र चढउतारासाठी पुलाजवळचा भाग सहज असल्याने त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. पुलाच्या १६ ही पिल्लरजवळ पाच पाच फुटाचे खोल खड्डे रेती उपसल्यामुळे पडले आहे. पायव्याजवळचा दगडही उघडा पडल्याचे दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कुरणपिंपरी या गावातील गोदावरी नदीवरील पुलासारखीच या पुलाची अवस्था होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने रविवारी या पुलाची पाहणी केली. तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदास खाडे, वामनराव चव्हाण या गावकऱ्यांनी सांगितले की, कंत्राटदार पुलाच्या अगदी जवळूनच रेती उपसत आहे. गेल्या ५० वर्षांपासून नदीपात्रात रेतीचे उत्खनन होत आहे. परंतु पाच वर्षांपासून पुलाजवळूनच रेती खोदल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The risk of expending the pool of Panganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.