सहायक फौजदाराची निवृत्ती ठरली सेवेचा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:13+5:30
काल मंगळवारी लोहारा चौकात बंदोबस्तावर असतानाच या फौजदाराला सहकाऱ्यांनी निरोप दिला. लोहारा पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक कांबळे यांनी १९८७ मध्ये जिल्हा पोलीस दलात प्रवेश केला. पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक असा त्यांचा सेवेचा प्रवास आहे. सेवेतील काही काळ त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणूनही कामकाज केले आहे.

सहायक फौजदाराची निवृत्ती ठरली सेवेचा आदर्श
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार निर्माण केला आहे. भल्याभल्यांना या विषाणूच्या संसर्गाची भीती आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरही सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने विविध कारणे पुढे करून सेवा देणे टाळत आहे. अशा वातावरणात सेवानिवृत्ती तोंडावर आली असताना व हक्काच्या तीन महिन्यांच्या रजा शिल्लक असतानाही लोहारा पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराने निवृत्तीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत खात्याची सेवा केली. काल मंगळवारी लोहारा चौकात बंदोबस्तावर असतानाच या फौजदाराला सहकाऱ्यांनी निरोप दिला.
लोहारा पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अशोक कांबळे यांनी १९८७ मध्ये जिल्हा पोलीस दलात प्रवेश केला. पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक असा त्यांचा सेवेचा प्रवास आहे. सेवेतील काही काळ त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणूनही कामकाज केले आहे. पोलीस दलातील सेवा ही सलग व सुरळीत करण्याची संधी नशिबवान व्यक्तीलाच मिळते. सतत वेगवेगळ्या घडामोडी व शिस्तीचं खातं असल्याने थोडीशीही चूक महागात पडणारी असते. मात्र अशोक कांबळे यांनी आपल्या काटेकोर शिस्तीचे पालन करून प्रामाणिकपणे पोलीस म्हणून समाजाची सेवा केली. मिळेल ती जबाबदारी त्यांनी पूर्ण क्षमतेने पार पाडली. कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग होरपळत आहे. अनेकजणांनी विविध कारणं सांगून या काळात स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आपल्या कर्तव्याला प्रथम मानत हक्काच्या रजांवर पाणी सोडून कांबळे यांनी कोरोना विषाणू बंदोबस्तासाठी सेवा दिली. लोहारा चौकात बंदोबस्तावर असतानाच मंगळवार, ३१ मार्चला सायंकाळी त्यांनी निवृत्ती स्वीकारली. ठाणेदार सचिन लुले व सहकारी कर्मचाºयांनी त्यांचा येथेच छोटेखानी निरोप समारंभ घेतला. या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याची माहिती मिळताच खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी त्यांची भेट घेऊन सेवेचा हा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. कर्तव्यनिष्ठतेबाबत अशोक कांबळे यांची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडेही पाठविण्यात आली. कांबळे यांच्या एकंदरच सेवेपेक्षा त्यांची निवृत्ती ही सर्वांनाच आदर्श देणारी आहे.
वडील दुसऱ्या महायुद्धात लढले
कांबळे यांना शिस्तीचे बाळकडू वडिलांपासून मिळाले. कांबळे यांचे वडील दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्राचे सैनिक म्हणून लढले. घरची परिस्थिती बेताची असतानाही कांबळे यांनी फुटबॉलपटू म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. याच आधारावर बी.ए.च्या पहिल्या वर्षालाच त्यांची पोलीस दलात निवड झाली. वडिलांचे संस्कार व शिस्त याचे पालन करत अशोक कांबळे यांनी समाजाची सेवा केली.