Retired employees of 'ST' have to take the pass for help | ‘एसटी’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाससाठी घ्यावे लागताहेत हेलपाटे

‘एसटी’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाससाठी घ्यावे लागताहेत हेलपाटे

ठळक मुद्देआर्थिक दणका । यवतमाळ विभागीय कार्यालयाच्या कारभाराविषयी रोष व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकवाहिनीची सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या उदासीन कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. छोट्या-छोट्या कामासाठी त्यांना या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागते. आता त्यांना सहा महिन्याच्या विनामूल्य पासकरिता वारंवार चकरा माराव्या लागत आहे. पास नसल्याने त्यांना प्रवासाचा आर्थिक दणका बसत आहे.
सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना विनामूल्य सहा महिने प्रवास पास दिली जाते. ३१ डिसेंबर २०१८ रोजी महामंडळाने याविषयीचे परिपत्रक काढले. राज्यभरातील सुमारे ४२ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी या पत्रकानुसार अंमलबजावणीही केली जात आहे. यवतमाळ विभागातही या पास कर्मचाऱ्यांना मिळाल्या आहे. मात्र सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्याच्या पास त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. आज सप्टेंबरचे १५ दिवस निघून गेले आहे. या कालावधीत काही सेवानिवृत्तांना तिकीट काढून प्रवास करावा लागला आणि आताही पास मिळेपर्यंत करावा लागणार आहे. या पासवर पती-पत्नी अशा दोघांना विनाशुल्क प्रवास करता येतो. अचानक घडलेल्या प्रवासाच्यावेळी पासअभावी तिकीट काढण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. यवतमाळ विभागातील अनेक सेवानिवृत्त या पासपासून वंचित आहेत. याविषयी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने विभाग नियंत्रकांकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र दुर्लक्ष करण्यात आले. विनाशुल्क पासची योजना जुलैपासून सुरू होते. असे असतानाही आवश्यक तेवढ्या पासेस उपलब्ध करून घेण्याची तसदी या विभागाने दाखविली नाही. सेवानिवृत्त कामगारांना अतिशय तोकड्या निवृत्तीवेतनावर गुजरान करावी लागते. अशातच त्यांना केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. यावर अधिकाºयांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

प्रलंबित प्रश्नांकडे महामंडळाचे दुर्लक्ष
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांकडे महामंडळाचे दुर्लक्ष सुरू आहे. प्रश्न निकाली काढण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक बाबीविषयी प्रश्नांचा समावेश आहे. महामंडळ आणि शासनाने लक्ष देण्याची मागणी संघटनेकडून होत आहे.

Web Title: Retired employees of 'ST' have to take the pass for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.