शांततेची जबाबदारी मंडळांवर
By Admin | Updated: August 20, 2014 23:46 IST2014-08-20T23:46:42+5:302014-08-20T23:46:42+5:30
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सार्वजनिक मंडळांवरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची संपूर्ण जबाबदारी राहील, असे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक

शांततेची जबाबदारी मंडळांवर
सार्वजनिक गणेशोत्सव : विघ्नसंतोषींवर पोलिसांचा वॉच - बिपीन बिहारी
यवतमाळ : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सार्वजनिक मंडळांवरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची संपूर्ण जबाबदारी राहील, असे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी स्पष्ट केले.
आगामी गणेशोत्सव, दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी बिपीन बिहारी बुधवारी यवतमाळात आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची क्राईम मिटींग घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत बिपीन बिहारी म्हणाले, सण-उत्सव हे आपली परंपरा असून त्याद्वारे समाजात एकोपा निर्माण होणे आवश्यक आहे. सण-उत्सवासाठी सार्वजनिक मंडळे पुढाकार घेतात. मात्र अनेकदा ही मंडळे स्थिती बिघडल्यानंतर आपले अंग काढून घेतात आणि पोलिसांवर जबाबदारी लोटतात. परंतु आता हा प्रकार चालणार नाही. गणेशोत्सवासाठी पुढाकार घेणाऱ्या सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेशाचे आगमन, मुक्काम आणि प्रस्थानापर्यंत कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याची, शांततेला बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. शांततेची जबाबदारीच त्यांच्यावर सोपविली जाणार असून पोलीस त्यांच्या दिमतीला राहणार आहे.
उत्सव काळात समाज विघातक कारवाया करणाऱ्या विघ्नसंतोषी घटकांवर पोलिसांची खास नजर राहणार आहे. त्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क निर्माण करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहे. सार्वजनिक मंडळ, संवेदनशील ठिकाणे, मिरवणुकीचे मार्ग, गणेशोत्सव स्थापनेची जागा, पदाधिकाऱ्यांचे अंतर्गत वाद अशा कोणत्याही कारणावरून उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असल्याने या प्रत्येक बाबी तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आले. शांतता समिती, व्यापारी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, मंडळांचे पदाधिकारी यांचा सहभाग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शांततेला आव्हान देऊ पाहणाऱ्या रेकॉर्डवरील आणि नव्या घटकांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईसह आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यासाठी शासनाच्या अन्य विभागाची मदत घेण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि ठाणेदारांना दिलेले असल्याचे बिपीन बिहारी यांनी सांगितले. दरम्यान, क्राईम मिटींगमध्ये बिहारी यांनी काही ठाणेदारांची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात येते. (जिल्हा प्रतिनिधी)