कळंब येथील सफाई कामगारांचे वेतनवाढीसाठी नगराध्यक्षांना निवेदन
By Admin | Updated: July 6, 2016 02:49 IST2016-07-06T02:49:24+5:302016-07-06T02:49:24+5:30
येथील सफाई कामगारांना अजूनही १६० रुपये रोजाने काम करावे लागत आहे. इतक्या कमी पैशात घर चालविणे कठीण आहे.

कळंब येथील सफाई कामगारांचे वेतनवाढीसाठी नगराध्यक्षांना निवेदन
कळंब : येथील सफाई कामगारांना अजूनही १६० रुपये रोजाने काम करावे लागत आहे. इतक्या कमी पैशात घर चालविणे कठीण आहे. त्यामुळे कमीतकमी ३०० रुपये रोज करण्यात यावा, अशी मागणी येथील सफाई कामगारांनी केली आहे. यासाठी नगराध्यक्ष दिगांबर मस्के आणि मुख्याधिकारी संजय होटे यांना निवेदन सादर करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून सफाई कामगार कमी पगारात काम करीत आहे. आतापर्यंत ग्रामपंचायतीचे कर्मचारी म्हणून त्यांनी काम केले. आता नगरपंचायतीचे कर्मचारी म्हणून काम करीत आहे. त्यामुळे पगारात वाढ होणे अपेक्षित होते. परंतु एक रुपयाही वाढ करण्यात आली नाही. दुसरीकडे वेतनही नियमित होत नाही. त्यामुळे सर्व सफाई कामगारांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. पगारात वाढ करून दर महिण्याच्या पहिल्या तारखेला पगार करण्यात यावा, अशी मागणी सफाई कामगारांनी केली आहे. शहराचा व्याप वाढला आहे. त्यामुळे कामाचाही ताण वाढल्याने या बाबीवर गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर श्रावण मलांडे, हनुमंता चुरडुके, चंद्रकांत थोरात, शंकर समुद्रे, शंकर धनस्कार, उमेश दावणेकर, बंडू नरगळे, मिथून मिसळे, प्रदीप मोहळ, मनीष नरगळे, जगदीश थोरात, अतुल चतुरपाळे, आकाश वाईके, आकाश समुद्रे, सुरज समुद्रे, आनंद समुद्रे, करण समद्रे, सिध्दार्थ नरगळे, प्रफुल्ल जाधव, रंजित हिवरे, सुंदरबाई समुद्रे, चंदा समुद्रे, लता समुद्रे, ज्योती समुद्रे, गौरीबाई दावणेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)