धामणगाव रोडवरील १०० वृक्षांचे पुनर्रोपण

By Admin | Updated: June 20, 2017 01:13 IST2017-06-20T01:13:55+5:302017-06-20T01:13:55+5:30

रस्ते विकास करताना सावली देणारी परिपक्व झाडे नष्ट होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने वृक्ष पुनर्रोपणाचा निर्णय घेतला आहे.

Reproduction of 100 trees on Dhamangaon road | धामणगाव रोडवरील १०० वृक्षांचे पुनर्रोपण

धामणगाव रोडवरील १०० वृक्षांचे पुनर्रोपण

जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग : ७० ते १०० वर्षे जुनी झाडे जांब रोडवर हलविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रस्ते विकास करताना सावली देणारी परिपक्व झाडे नष्ट होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने वृक्ष पुनर्रोपणाचा निर्णय घेतला आहे. त्यातून धामणगाव रोडवरील ७० ते १०० वर्षे जुन्या १०० झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.
दळणवळण वेगवान व्हावे म्हणून रस्त्यांची लांबी-रुंदी वाढवून रस्ते चौपदरी केले जात आहेत. परंतु रस्त्यांचा हा विकास करताना त्यात अडसर ठरणाऱ्या ७० वर्षांपेक्षा अधिक जुन्या झाडांची सर्रास कत्तल केली जाते. यामुळे महामार्गावर सावली मिळेनाशी झाली आहे. आपल्या डोळ्यादेखत सर्रास होणारी परिपक्व वृक्षांची ही कत्तल पाहून सामान्य नागरिकांचे मनही हळहळते आहे. वृक्षांची ही कत्तल थांबविण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम खात्याने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वृक्ष पुनर्रोपणाचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग धामणगाव रोडवर केला जाणार आहे. धामणगाव रोडवरील पोस्ट आॅफीस चौक ते बाजार समिती चौक दरम्यान १०० परिपक्व वृक्ष आहेत. ही वृक्षे तेथून उचलून पर्यायी जागी किंवा जांब रोडवर १०० एकरमध्ये होऊ घातलेल्या फॉरेस्ट गार्डनमध्ये शिप्ट केले जाणार आहेत. मुंबई-पुण्याच्या एजंसीला त्याचे कंत्राट देण्यात आले. प्रत्येक झाडाच्या पुनर्रोपणावर २५ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. सुमारे २५ लाखांचे बजेट असलेल्या या पुनर्रोपण कामाला दोन दिवसात प्रारंभ होणार आहे. मुंबई-ठाण्यात हे प्रयोग यशस्वी झाले आहे.

११ किमी रस्त्याचे चौपदरीकरण
धामणगाव रोडवरील पोस्ट आॅफीस चौक ते करळगाव या ११ किलोमीटरच्या मार्गाचे केंद्रीय रस्ते निधीतून चौपदरीकरण केले जात आहे. हे चौपदरीकरण करताना दोन किलोमीटरचा घाट सरळ करून रस्त्याचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे. या मार्गात सहा पुल आहेत, दोनही बाजूला आठ मीटरचा रस्ता आहे, रस्त्याची रुंदी सर्व ठिकाणी १० मीटर केली जाणार आहे, वळण कमी करण्याचा प्रयत्न आहे, तीन पूल पूर्ण झाले आहे, घाटातही दोन पूल आहेत. डिव्हायडर, नाली, फूटपाथ, स्टेट बँक चौकाचे सौंदर्यीकरण अशा अनेक बाबी यात समाविष्ठ आहेत. दीड वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी हा मार्ग चौपदरी झालेला असेल, असे बांधकाम खात्यातून सांगण्यात आले.
या मार्गावर आतापर्यंत अमरावतीचे मुख्य अभियंता शेखर तुंगे, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधीक्षक अभियंता मुरादे, तेथील कार्यकारी अभियंता, यवतमाळचे अधीक्षक अभियंता एस.व्ही. सोनटक्के व त्यांच्या अधिनस्त चमूने अनेकदा भेटी देऊन कामांच्या सुधारणेबाबत सूचना केल्या आहेत. त्याचवेळी कामाच्या गतीबाबत समाधानही व्यक्त केले आहे. आठ वर्षांपूर्वी सात कोटी रुपये खर्च करून दारव्हा रोडच्या नऊ किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात आले होते. धामणगाव रोडसाठी ४५ कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले. त्यामुळे दारव्हा रोडपेक्षाही उत्तम धामणगाव रोड होणार असल्याचे बांधकाम विभागातून सांगण्यात आले.

रस्ते विकास महामंडळामध्ये केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रयोगाचा डेमो दाखविला होता. १६० ते १७० वर्षे जुनी वृक्षे अगदी सुरक्षितरीत्या ट्रान्सप्लान्ट केली जातात. यवतमाळात धामणगाव रोडवर ट्रान्सप्लान्टचा पहिला प्रयोग केला जात आहे. तो यशस्वी झाल्यास सीआरएफच्या अन्य दोन रस्त्यांवर आणि जिल्ह्यात सर्वदूर तो लागू केला जाईल. वडगाव रोडवरील वन उद्यानात किंवा विशेष झोन निर्माण करून ही १०० वृक्षे स्थानांतरित केली जातील.
- मदन येरावार, बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री, यवतमाळ.

धामणगाव रोडवर रिप्लॅन्टेशनचा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग होत आहे. ८० ते १०० झाडे तेथून उचलून सुरक्षितरीत्या हलविली जाणार आहे.
- एस.व्ही. सोनटक्के
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, यवतमाळ

Web Title: Reproduction of 100 trees on Dhamangaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.