कामगार करारास वारंवार विलंब ; यवतमाळ येथील रेमंड कंपनीत कामगारांचा संप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:06 IST2025-07-22T13:03:45+5:302025-07-22T13:06:51+5:30
कामगार करारास वारंवार विलंब : तोडगा नाहीच

Repeated delays in labor contracts; Workers strike at Raymond Company in Yavatmal
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :यवतमाळ येथील सर्वात मोठा उद्योग असलेल्या रेमंड कंपनीतील कामगारांनी सोमवार (२१ जुलै) दुपारी ३ वाजतापासून संपाचा मार्ग अवलंबला. कामगार करारास वारंवार विलंब होत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. दुपारच्या पाळीतील ५७५ हून अधिक कामगार काम बंद ठेवून कंपनीच्या आवारात ठिय्या देऊन आहेत. दरम्यान, कंपनी प्रशासन आणि मान्यताप्राप्त कामगार संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये संपावर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
रेमंडच्या माध्यमातून १ हजार ७८५ कामगारांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. प्रत्येक चार वर्षानंतर आर्थिक बाबींसह इतर सवलतीच्या दृष्टीने मान्यताप्राप्त संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चेतून तोडगा काढून करार मान्य केला जातो. मार्च २०२४ मध्ये मागील चार वर्षाचा करार संपुष्टात आला. यानंतर कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये वारंवार बैठका झाल्या. परंतु करारावर शिक्कामोर्तब होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. वारंवार तोच तोच प्रकार होत असल्याने प्रामुख्याने प्रहार आणि विश्वकर्मा कामगार संघटनेच्या सदस्यांनी संप सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा निघाला नव्हता.
मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत यापूर्वी दोन वेळा बैठक झाली. सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता तिसरी बैठक होणार होती. त्यापूर्वीच दुपारी ३ वाजतापासून कामगार संघटनांनी संप सुरू केला आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न आहे.
रेमंड कंपनीमध्ये कामगारांनी संप सुरू केला आहे. सायंकाळी ५च्या सुमारास याची माहिती मिळाल्यानंतर अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने रेमंड कंपनी परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न असल्याचे अवधूतवाडी पोलिसांनी सांगितले.
"नितीन श्रीवास्तव, मुख्य प्रबंधक, रेमंड इको डेनिम, यवतमाळ पगारवाढ आणि इतर सवलती मिळाव्या, यासाठी होणाऱ्या कराराला विलंब लावला जात आहे. केवळ बैठका घेतल्या जात आहेत. समाधानकारक तोडगा निघत नसल्याने संपाचा निर्णय घेण्यात आला आहे."
- सचिन देशमुख, अध्यक्ष, रेमंड कामगार संघटना
"प्रशासनासोबत सोमवारी तिसरी बैठक होती; परंतु होऊ शकली नाही. अजूनही मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे पदाधिकारी कंपनीतच आहेत. संपात कोणाच्या संघटनेचे सदस्य सहभागी झाले, हे सांगू शकत नाही."
- कैलास इंगळे, अध्यक्ष, रेमंड कामगार संघ.