१९७५ च्या मदतीची कोरोनात परतफेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:32+5:30
गोविंद वाकडे हे त्यावेळी शेताच्या रखवालीचे काम करायचे. १९७५ च्या ओल्या दुष्काळाने गावकऱ्यांसमोर भीषण संकट ओढवले होते. सततच्या पावसाने कोंब फुटली असल्याने धान्याची दुर्गंधी गावांमध्ये पसरली होती. अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. अशावेळी पोळा सणाच्या दिवशी गोविंद वाकडे यांची तिन्ही मुले व पत्नी दोन दिवसांपासून घरातच उपाशी असल्याने, गोविंदा नगराळे यांनी एक ग्लास कण्याची मदत केली आणि कुटुंबाला जीवदान दिले.

१९७५ च्या मदतीची कोरोनात परतफेड
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : महाराष्ट्रात १९७५ साली ओला दुष्काळ पडला होता. या दुष्काळात लोकांना कित्येक दिवस स्वत:च्या घरातच काढावे लागले. अशावेळी वटफळीतील दानशूर गोविंदा उर्फ साधू नगराळे यांनी गोविंद वाकडे यांच्या गरीब कुटुंबीयांना पोळ्याच्या सणाला एक ग्लास ज्वारीच्या कण्या देऊन जीवदान दिले होते. त्याची परतफेड म्हणून गोविंदराव वाकडे यांचा मुलगा अंकुश वाकडे यांनी साधू नगराळे यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे यांना कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये स्वत: वटफळीला जाऊन धान्याची मदत केली.
गोविंद वाकडे हे त्यावेळी शेताच्या रखवालीचे काम करायचे. १९७५ च्या ओल्या दुष्काळाने गावकऱ्यांसमोर भीषण संकट ओढवले होते. सततच्या पावसाने कोंब फुटली असल्याने धान्याची दुर्गंधी गावांमध्ये पसरली होती. अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. अशावेळी पोळा सणाच्या दिवशी गोविंद वाकडे यांची तिन्ही मुले व पत्नी दोन दिवसांपासून घरातच उपाशी असल्याने, गोविंदा नगराळे यांनी एक ग्लास कण्याची मदत केली आणि कुटुंबाला जीवदान दिले. आज या घटनेला ४५ वर्ष झाली. त्यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे वटफळीत वास्तव्याला आहे. त्याची परिस्थिती जेमतेम आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन जीवघेण्याप्रसंगात यवतमाळमध्ये रहिवासी असलेले अंकुश वाकडे यांनी वटफळी येथे जाऊन नगराळे कुटुंबाला मदतीचा हात दिला. धान्याची कीट देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी तरनोळी येथील सामाजिक कार्यकर्ते कपिल तायडे उपस्थित होते.
लाखमोलाची मदत
मी तीन वर्षांचा असताना माझ्या परिवाराला साधू उर्फ गोविंदराव नगराळे व त्यांच्या पत्नी अलकाबाई नगराळे यांनी केलेली मदत आमच्यासाठी लाख मोलाची ठरली. त्या ज्वारीच्या कण्या मिळाल्या नसत्या तर आम्ही तिन्ही भावंड जगलो नसतो. त्यामुळे त्या मदतीची परतफेड म्हणून मी त्यांचा मुलगा सिद्धार्थ नगराळे यांना मदत केली आहे. या परिस्थितीत ही मदत करणे मला मोलाचे वाटले, असे मत प्रा अंकूश वाकडे यांनी व्यक्त केले.
सामाजिक जबाबदारी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे रोजगार, मजुरी बुडत आहे. जवळ असलेला पैसा, घरातील अन्नधान्य संपत आले आहे. त्यांच्यापुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न आहे. अशावेळी मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे. ग्रामीण भागातही आपापल्यापरीने मदत करीत आहे.