बिटरगाव येथे ५९ विकास कामांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:48 IST2019-07-07T22:48:09+5:302019-07-07T22:48:48+5:30
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला.

बिटरगाव येथे ५९ विकास कामांचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
बिटरगाव : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश पेंधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष उत्तमराव इंगळे, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने उपस्थित होते. यावेळी उत्तमराव इंगळे यांनी गावाच्या विकासासाठी एकता महत्वाची असल्याचे सांगितले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यातील ७६ गावांमध्ये विकास कामे करीत असून ३९ मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. आदिवासी विकास विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार नजरधने यांनी जोपर्यंत शासन आणि प्रशासन एकत्र येत नाही, तोपर्यंत विकास होणार नाही, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जिल्ह्यात विविध गावात अनेक कामे हाती घेण्यात आली असून शासनाच्या विकास योजना निरंतर चालल्या पाहिजे, असे सांगितले. या अभियानातून येथील तीन जिल्हा परिषद शाळा डीजिटल करण्यात आल्या. शुद्ध पाण्यासाठी आरो फिल्टर मशीन व एटीएम बसविले. शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. समाज मंदिर व शाळेची रंगरंगोटी केली. गावात अभ्यासिका तयार करून फर्निचर व पुस्तके खरेदी केली. बचत गट प्रशिक्षणासाठी साहित्य खरेदी केले. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक प्रल्हाद पवार व गावकऱ्यांच्या मदतीने गावात गेल्या दोन वर्षात ही विकास कामे करण्यात आली. संचालन गजानन नरसलवाड, तर आभार प्रकाश भेदेकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रेखा आडे, रमेश आडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे व्यवस्थापक युवराज सासवडे व गावकरी उपस्थित होते.