हमी दरापेक्षा उडीदाला कमी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 21:36 IST2017-09-27T21:35:55+5:302017-09-27T21:36:19+5:30
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमी दरापेक्षाही कमी दराने उडीदाची खरेदी होत असल्याने शेतकरी संतापले आहेत.

हमी दरापेक्षा उडीदाला कमी दर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमी दरापेक्षाही कमी दराने उडीदाची खरेदी होत असल्याने शेतकरी संतापले आहेत. या दरात तब्बल २४०० रूपयांची तफावत असल्याने शेतकºयांनी येथील बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बंद पाडली.
केंद्र शासनाने शेतमालाचे हमी दर जाहीर केले. त्या दरानुसार शेतमालाची खरेदी होणे बंधनकारक आहे. मात्र येथील बाजार समितीमध्ये हमी दरापेक्षा तब्बल २४०० रूपये कमी दराने उडीदाची खरेदी केली जात आहे. उडीदाचे हमी दर ५४०० रूपये प्रती क्विंटल असताना तोकेवळ २५०० ते ३००० रूपयांत खरेदी केला जात असल्याने शेतकरी संतापले. दरात २४०० रूपयांची तफावत असल्याने त्यांनी बुधवारी लिलाव प्रक्रियाच बंद पाडली.
याबाबत माहिती मिळताच बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, उपसभापती गजानन डोमाळे यांनी राज्य शासनाचा निषेध नोंदविला. लिलाव सुरू असणाºया ठिकाणी त्यांनी धाव घेतली. यावेळी काही संचालकही उपस्थित होते. कमी दराने खरेदी झाल्यास कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक आणि बाजार समितीच्या सचिवांची चमू कारवाई करू शकते. मात्र तालुका कृषी अधिकारी व सहाय्यक निबंधकांनी बाजार समितीत येण्यास नकार दिल्याचा आरोप सभापती रवींद्र ढोक यांनी केला. यामुळे उडीदाची खरेदी तूर्तास थांबली आहे. व्यापाºयांनी मात्र खासगी बाजारात उडीदाचे भाव एवढेच आहे असे म्हणत, हमी दराने खरेदीस नकार दिला. बाजार समितीने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी तत्काळ हमी केंद्र सुरू करण्याची मागणी मार्केटिंग फेडरेशनकडे केली.