भरती झाली, पण नियुक्त्या नाहीत ; २,४८८ पात्र उमेदवार अद्याप प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:46 IST2025-07-14T16:45:53+5:302025-07-14T16:46:36+5:30
Yavatmal : निकाल घोषित होऊनही २,४८८ पदांवर नियुक्ती नाही

Recruitment done, but no appointments – 2,488 eligible candidates still waiting
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पेसा क्षेत्रात १७ संवर्गातील पदे भरण्यासाठी शासनाने भरती प्रक्रिया राबवली होती. यात ७ ते ८ संवर्गातीलच पदे शासनाने भरली. इतर संवर्गातील सहा हजार ९३१ पदे आजपर्यंत भरली नाहीत. दोन हजार ४८८ पदांचा निकाल घोषित आहे. तर तीन हजार ६९३ पदांचा निकाल तयार असला तरी तो राखून ठेवला आहे. यामुळे आदिवासींवर अन्याय होत आहे.
शासनाने पेसा क्षेत्रात तलाठी ५७४, ग्रामसेवक ४२२, अंगणवाडी पर्यवेक्षक ५७, शिक्षक एक हजार ५४४, कृषी सहायक ३६५, पशुधन पर्यवेक्षक १२९, परिचारिका एक हजार ३८४, आरोग्यसेवक ग्रामविकास विभाग ५८३, सार्वजनिक आरोग्य विभाग २४१, वनरक्षक ८८२, कोतवाल ८४ आणि पोलिस पाटलांच्या ६६६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. त्यानंतर निकाल घोषित करण्यात आला; परंतु तलाठी ५७४, शिक्षक एक हजार ५४४, पशुधन पर्यवेक्षक १२९, आरोग्य सेवक सार्वजनिक आरोग्य विभाग २४१ अशा दोन हजार ४८८ पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली नाही. तीन हजार ६९३ पदसंख्येचा निकालही तयार आहे; मात्र आजपर्यंत तो घोषित केला नाही. त्यामुळे ४२२ ग्रामसेवक, ३६५ कृषी सहायक, एक हजार ३८४ परिचारिका, ५८३ आरोग्यसेवक ग्रामविकास तर ८८२ वनरक्षक पदाच्या नोकरीपासून आदिवासींना वंचित राहावे लागत आहे.
सचिवांनी घेतली बैठक
- पेसा क्षेत्रातील पदभरतीचा विषय विधानसभेतही गाजला. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनी राज्यातील सर्व सहायक आयुक्तांची ९ जुलै रोजी व्हीसी घेतली.
- यात मागासवर्ग कक्षामार्फत किती संवर्गातील बिंदू नामावली तपासली आणि आरक्षणानुसार पदभरतीची सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेतला.
- दरम्यान, शनिवारी यवतमाळात धरती आबा अभियान कार्यक्रमावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी महिनाभरात १०० टक्के पदे भरणार असल्याचे सांगितले.