ठाणेदार बदलीवरून ‘राज’कारण
By Admin | Updated: June 2, 2017 01:38 IST2017-06-02T01:38:13+5:302017-06-02T01:38:13+5:30
जिल्ह्यातील ठाणेदारांच्या नुकत्याच झालेल्या बदल्यांवरून ‘राज’कारण सुरू झाले आहेत. दोन ठाणेदारांना का हटविले नाही

ठाणेदार बदलीवरून ‘राज’कारण
शिवसेना-भाजपाची नाराजी : चार पोलीस ठाण्यांचा वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील ठाणेदारांच्या नुकत्याच झालेल्या बदल्यांवरून ‘राज’कारण सुरू झाले आहेत. दोन ठाणेदारांना का हटविले नाही म्हणून शिवसेना नाराज आहे. तर आपल्या परवानगीशिवाय ठाणेदाराची केलेली बदली व दिलेली नेमणुक यावरून भाजपात नाराजी आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी नुकत्याच ठाणेदारांच्या बदल्या केल्या. त्यात अनेक ठाण्यात फेरबदल करण्यात आले. राजकीय दबाव झुगारुन, मेरीटवर पारदर्शक पद्धतीने या बदल्या झाल्याचे मानले जाते. बदल्या करताना कार्यकाळ, भविष्यात येऊ घातलेले सण-उत्सव, कायदा व सुव्यवस्थेची संभाव्य स्थिती, कोर्ट-कचेरी आदीबाबी विचारात घेतल्या गेल्या. परंतु या बदल्यांबाबत सत्ताधारी भाजपा-सेनेची नेते मंडळी नाराज असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बुधवारी झालेल्या क्राईम मिटींगमध्येसुद्धा यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
शिवसेनेला दिग्रस व दारव्हा या दोन ठाण्यात नवे चेहरे बसवायचे आहेत. तेथे अनुक्रमे शिवाजी बचाटे आणि अनिलसिंह गौतम हे ठाणेदार आहेत. त्यांची वागणूक व कामाच्या पद्धतीबाबत कार्यकर्त्यांनी नेत्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. या दोनही ठाणेदारांची कोणत्याही परिस्थितीत तत्काळ बदली करा, अशी शिवसेनेची भूमिका आहे. अनिलसिंह गौतम हे उपअधीक्षक पदावरील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. यादी केव्हा निघते याकडे त्यांच्या नजरा लागल्या आहेत. शिवाजी बचाटे यांना दिग्रसमध्ये अद्याप वर्षही पूर्ण झाले नसताना त्यांची बदली करायची कशी असा प्रश्न पोलीस प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. त्यांची बदली केल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. दारव्हा व दिग्रस ही संवेदनशील ठिकाणे आहेत. तेथे अनुभवी ठाणेदारांची आवश्यकता आहे. समोर सण-उत्सव येऊ घातले आहे. त्या काळात तेथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान राहणार आहे. त्याचा विचारही प्रशासन करीत आहे.
आर्णीतून उचलले व राळेगावात दिल्याने नाराज
ठाणेदारांच्या बदलीवरून आर्णी व राळेगावातील भाजपाची नेते मंडळी नाराज आहे. आपल्या पूर्वपरवानगीशिवाय आर्णीचे ठाणेदार संजय खंदाडे यांची बदली का केली, असा भाजपा नेत्यांचा सवाल आहे. तर खंदाडे यांना राळेगावचे ठाणेदार बनविले कसे, हा तेथील भाजपा नेत्यांचा प्रश्न आहे. राळेगाव ठाणेदाराच्या खुर्चीत अचानक नवा चेहरा दिला गेल्याने या खुर्चीतील जुन्या चेहऱ्यावर प्रचंड संताप पहायला मिळतो आहे. सत्ताधारी सेना-भाजपा नेत्यांच्या नाराजीमुळे पोलीस प्रशासनही पेचात सापडले आहे. प्रशासन कायदेशीर तरतुदी डोळ्यापुढे ठेऊन बदल्यांमधील मेरीटवर कायम राहते की, राजकीय नाराजी दूर करते याकडे लक्ष लागले आहे.