रेमण्ड कंपनीतील कामगारांचा वेतनवाढीचा संप बेकायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:36 IST2025-07-24T12:35:38+5:302025-07-24T12:36:38+5:30
औद्योगिक न्यायालयाचा आदेश : कंपनीच्या १५०० मीटर परिसरात

Raymond Company workers' strike for wage hike illegal
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील रेमण्ड कंपनीतील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह कराराच्या मागणीसाठी सुरू केलेला संप बेकायदेशीर असल्याचा आदेश बुधवारी सायंकाळी औद्योगिक न्यायालयाने दिला. याबरोबरच कंपनीच्या १५०० मीटर परिसरात कुठल्याही प्रकारची आंदोलनात्मक कृती करण्यास न्यायालयाने मनाई केली असून कंपनी परिसरात कायदा, सुव्यवस्था राखण्याचे निर्देश अवधूतवाडी पोलिसांना देण्यात आले आहेत.
कामगारांचे अॅग्रीमेंट करताना वेतनवाढीची रक्कम सात हजार २५० पेक्षा जास्त करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी रेमण्ड कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. बुधवारी संपाचा तिसरा दिवस होता. कंपनी व्यवस्थापनाने संपकऱ्यांसाठी कॅन्टीन तसेच इतर सुविधा बंद केल्या होत्या. या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच औद्योगिक न्यायालयाने हा संप बेकायदेशीर असल्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशानंतर कंपनी परिसरातील संपकरी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आवाराबाहेर काढले. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कर्मचाऱ्यांनी नंतर वाघापूर मार्गावरील आदित्य मंगल कार्यालयात एकत्र येऊन सभा घेतली. न्यायालयाच्या निकालानंतर कोणती भूमिका घ्यायची, याबाबत उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. न्यायालयाच्या निकालानुसार जिल्हा प्रशासनाने कामगारांना अगोदर कामावर रुजू व्हा, कराराबाबतचा विषय चर्चेतून सोडवा असे सांगितले. तर कंपनी व्यवस्थापनाने रेमण्डची एकूण स्थिती आणि होत असलेले नुकसान याबाबतची माहिती दिली. त्यानंतरही कामगार प्रतिनिधी अॅग्रीमेंटचा विषय लावून धरत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, कामगार अधिकारी राहुल काळे, रेमण्डचे एचआर चंद्रशेखर पातूरकर, व्यवस्थापन प्रमुख नितीन श्रीवास्तव, कामगार संघटनेचे प्रतिनिधी सचिन देशमुख, विकास जोमदे, बाळू काळे, कुणाल चव्हाण आदी उपस्थित होते.
काय आहे आदेश ?
- संपाच्या नावावर कर्मचाऱ्यांना कामगाराच्या गटाकडून धमकावले जात असल्याचे आढळून आले.
- प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती लक्षात घेता पीयूएलपी कायदा १९७१ च्या कलम २४चे पालन न करता हा संप सुरू आहे.
- या आदेशानुसार कंपनी परिसरात कोणत्याही आंदोलनात्मक कृतीस तात्पुरता प्रतिबंध घालण्यात येत आहे. तसेच १५०० मीटर अंतरावर आस्थापनेच्या कामकाजात अडथळा निर्माण होईल, अशी कुठलीही कृती करू नये. अवधूतवाडी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखावी.