रेशनकार्ड अर्ज वाटपात गोंधळ
By Admin | Updated: July 1, 2014 01:44 IST2014-07-01T01:44:05+5:302014-07-01T01:44:05+5:30
तालुक्यात अनेक नागरिकांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. नेर तहसील कार्यालयात ३० जून रोजी रेशनकार्ड अर्ज वाटप सुरू होते. मात्र नियोजनाचा अभाव असल्यामुळे

रेशनकार्ड अर्ज वाटपात गोंधळ
नेर : तालुक्यात अनेक नागरिकांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. नेर तहसील कार्यालयात ३० जून रोजी रेशनकार्ड अर्ज वाटप सुरू होते. मात्र नियोजनाचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी गोंधळ घातला. नागरिकांच्या असंतोषामुळे खुर्च्यांची फेकाफेकही करण्यात आली. अखेर तहसील प्रशासनाने पोलिसांना पाचारण करून प्रकरण शांत केले.
मागील दोन वर्षांपासून नेर तहसील कार्यालयात नवीन लाभार्थ्यांना व काही विभक्त कुटुंबांना रेशनकार्ड वाटप बंद होते. याबाबत विचारणा केली असता तहसील प्रशासनाकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जायची. प्रत्यक्षात कार्डाचे वाटप करायचेच नाही, असा तोंडी आदेश असल्याने रेशनकार्डाचे वाटप केले गेले नसल्याची बाब पुढे आली आहे. यासंदर्भात तहसीलदार शरयू आडे यांनी पाठपुरावा केला. नेर तहसील कार्यालयाच्या यापूर्वी झालेल्या हलगर्जीपणामुळे यवतमाळ कार्यालयातून अर्ज आणल्याचे टाळल्या गेल्याची बाबही समोर आली. रेशनकार्ड मिळावे म्हणून यवतमाळवरून २०० अर्ज मागविण्यात आले होते. त्याचे वाटप होणार असल्याची माहिती मिळताच लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात गर्दी केली. २०० अर्ज आणि हजार लाभार्थी यामुळे तहसील प्रशासनापुढे पेच निर्माण झाला. अखेर चिठ्ठी वाटपाने अर्ज वाटप करण्याचे ठरले. मात्र वेळेवर मजूरी पाडून आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे याठिकाणी एकच गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या नागरिकांनी खुर्च्यांची फेकाफेक केली. यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणून तहसील विभागाने पोलिसांना पाचारण केले. जमादार जीवन राठोड, प्रफुल्ल फुलकर यांच्यासह पोलिसांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्ज वाटप न झाल्यामुळे जनतेच्या मनातील असंतोष मात्र खदखदत होता. नागरिकांना त्वरित अर्ज पुरवठा करण्याची मागणी पुढे आली आहे. (तालुका प्रतिनिधी)