सावकारांचा व्याजदर तब्बल ३६ टक्के

By Admin | Updated: May 29, 2014 02:49 IST2014-05-29T02:49:16+5:302014-05-29T02:49:16+5:30

अडचणीच्या काळात सोने गहाण ठेवून गरज भागविली जाते. या अडचणीचा फायदा घेत गहाण

The rate of interest on the lenders is 36% | सावकारांचा व्याजदर तब्बल ३६ टक्के

सावकारांचा व्याजदर तब्बल ३६ टक्के

अडचणीच्या काळात सोने गहाण ठेवून गरज भागविली जाते. या अडचणीचा फायदा घेत गहाण सोन्यात शेतकरी, ग्राहकांची सर्रास लूट होत आहे. बॅंकांमध्ये सोने तारणाचा व्याज दर केवळ १३ ते १८ टक्के असताना सावकार मात्र याच सोन्यावर तब्बल ३६ टक्के वार्षिक व्याज आकारत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

सुवर्ण आभूषण हौस म्हणून खरेदी करण्यापेक्षा बचत म्हणून खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. अडचणीच्या काळात हमखास सोन्यावर पैसा उभा करता येतो. यामुळेच अनेकजण भविष्याच्या तरतुदीसाठी सोन्याची खरेदी करतात. मोठी अडचण आली की सोने गहाणात टाकून गरज भागविली जाते. सावकारासोबतच आता फायनान्स कंपन्या आणि बँकांकडेही सोने गहाण ठेवले जाते. ठराविक मुदतीसाठी घेतलेल्या रकमेवर व्याज आकारले जाते. दरमहा व्याजाची परतफेड किंवा एकमुस्त परतफेडही केली जाते. सोन्यावर कर्ज देणारे बिनधास्त असतात. कारण वसुलीची चिंता नसते. सोने सोडवून नेले नाही तर तेवढी रक्कम तयार असते.

सावकाराकडे सोने गहाण ठेवण्याची पूर्वापार परंपरा आहे. साधारणत: पेरणीच्या काळात शेतकरी सावकाराकडे सोने गहाण ठेवतात. मात्र या गहाणात होणारी शेतकर्‍यांची लूट प्रचंड असते. दरमहा तीन ते चार टक्के म्हणजे वार्षिक ३६ ते ४८ टक्के व्याज सावकार आकारतो.

सुवर्ण तारणातून ग्राहकांची लूट

यवतमाळ : साधारणत: किमतीच्या ६0 ते ७0 टक्केपर्यंत कर्ज दिले जाते. साधारणत: वर्षभरातच सोन्याच्या मूळ किमतीएवढे व्याज आणि मुद्दल होते. त्यामुळे सोने पचण्याचीच अधिक भीती असते. परंतु कोणत्याही कागदपत्राशिवाय आणि तत्काळ अध्र्या रात्रीसुद्धा पैसे मिळत असल्याने अनेकजण सोने गहाण ठेवताना सावकारालाच पसंती देतात.

याऊलट बॅंकांमध्ये सोने तारण ठेवण्याची प्रक्रिया थोडी किचकट असली तरी व्याज दर मात्र कमी आहे. वार्षिक १३ ते १८ टक्के व्याज दर आहे. तर नागरिक सहकारी पतसंस्थांचेही व्याज दर अशाच पद्धतीचे आहे. अलीकडे गोल्ड फायनान्स कंपन्याही सोने गहाण ठेवत आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये शेतकरी खातेदार आणि बिगर शेतकरी खातेदार असे दोन प्रकार आहे. बॅंकांच्या पॅनलवरील सुवर्णकाराकडून मूल्यांकन करून कर्ज किती द्यायचे हे ठरविले जाते. तसेच अनेक बॅंकांमध्ये दरमहा हप्ते भरून कर्ज परतफेडीची सुविधाही आहे. मात्र यासाठी बॅंकेच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यासाठी साधारणत: दोन ते तीन दिवस लागतात. बॅंका, पतसंस्था, गोल्ड फायनान्स आदी ठिकाणी सोने गहाण ठेवले जात असले तरी प्रत्येक ठिकाणी कागदी घोडे नाचवावेच लागतात आणि ग्राहकांना हीच कटकट नको असते. तत्काळ पैसे हवे असतात. यातूनच मग ग्राहकांची सावकार लूट करतात. यवतमाळ जिल्हय़ात अधिकृत आणि अनधिकृत सावकार मोठय़ा प्रमाणात ग्राहकांकडून सोने गहाण ठेवून त्यांची अक्षरश: लूट करीत आहे. (नगर प्रतिनिधी)

 

Web Title: The rate of interest on the lenders is 36%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.