बेंबळावर दुर्मिळ सूरय पक्ष्याचा विहार
By Admin | Updated: April 18, 2017 00:09 IST2017-04-18T00:09:00+5:302017-04-18T00:09:00+5:30
जगभरातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला ‘काळ्या पोटाचा सूरय पक्षी’ यवतमाळनजीक बेंबळा जलायशावर (ता.बाभूळगाव) आढळल्याने ....

बेंबळावर दुर्मिळ सूरय पक्ष्याचा विहार
लुप्तप्राय सूचित नोंद : परतीच्या स्थलांतरात यवतमाळात मुक्काम
यवतमाळ : जगभरातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला ‘काळ्या पोटाचा सूरय पक्षी’ यवतमाळनजीक बेंबळा जलायशावर (ता.बाभूळगाव) आढळल्याने पक्षी अभ्यासकांनी आश्चर्य व्यक्त केले. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन आॅफ नेचर या संस्थेच्या संवर्धनाच्या सूचीमध्ये चिंताजनक (लुप्तप्राय) प्रजाती म्हणून या पक्ष्याचा समावेश आहे, हे विशेष.
येथील अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी व सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दीपक दाभेरे यांनी या सूरयची नोंद केली. त्यांच्या निरीक्षणादरम्यान हा पक्षी एकटाच कल्लेदार सूरयच्या थव्यासोबत होता. सर्वसाधारणपणे भारतीय उपखंडातील मोठ्या नद्या व जलाशये, नेपाळ, चीन, बांग्लादेश, थायलंड, कंबोडिया, पाकिस्तान व व्हिएतनाम या देशामंध्ये आढळतो. परंतु, सध्या तो भारत, पाकिस्तान, बांग्लादेश वगळता इतर ठिकाणांहून नामशेष होत आहे. मोठ्या प्रमाणात हिमखंड वितळणे, नद्यांची पाण्याची पातळी वाढल्याने रेतीचे ढिगारे वाहून जाणे या कारणांनी सूरयचे प्रजनन स्थळ नष्ट होते. त्यांची अंडी, नवजात पिलांना शिकारी पक्षी मोठ्या प्रमाणात खातात. अशा या कारणांमुळे सूरय पक्षी दुर्मिळ बनत चालले आहे.
डॉ. दाभेरे म्हणाले, फेब्रुवारी ते एप्रिल हा या पक्षाचा प्रजनन काळ आहे. या दरम्यान पोटाचा खालचा व मानेचा भाग गडद काळा दिसतो. त्याची दुभंगलेली लांब शेपटी हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. पाण्यातील लहान मासे, किडे व खवलेदार सूक्ष्मजीव हे या पक्ष्याचे खाद्य आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
यवतमाळात वाढताहेत नोंदी
४यवतमाळ जिल्ह्याची पक्ष्यांची पहिली यादी प्रकाशित झाली आहे. त्यात ३१७ पक्ष्यांचा समावेश आहे. परंतु, परतीच्या स्थलांतरादरमान काही दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी या वर्षभरात झाल्या व त्यात भर पडत आहे. त्यामुळे यवतमाळ पक्षी गणनेमध्ये उच्चांक गाठेल. यासाठी निरंतर पक्षीनिरीक्षणाची गरज आहे, असे मत प्रा. प्रवीण जोशी यांनी व्यक्त केले.