रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 06:42 IST2025-09-08T06:40:14+5:302025-09-08T06:42:51+5:30

Morari bapu katha live: पहिल्या दिवशी हनुमान गाथा मांडल्यानंतर कथाकार मोरारीबापूंनी दुसऱ्या दिवशी रामकथेतील ‘वंदना प्रकरणा’ला सुरुवात केली.

Ramayana is not just a story but a religion, an art of living: Morari Bapu | रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू

रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू

यवतमाळ : ‘रामायण ही केवळ कथा नाही, तर धर्म शिकवणारी आणि जीवन जगण्याची कला आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध आध्यात्मिक संत आणि प्रख्यात कथाकार मोरारीबापूंनी रामकथेच्या दुसऱ्या दिवशी केले. पहिल्या दिवशी हनुमान गाथा मांडल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी रामकथेतील ‘वंदना प्रकरणा’ला सुरुवात केली.

राजा दशरथाने दिलेल्या दोन वचनांच्या संदर्भाने रामकथेची गाथा पुढे नेली. भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास या घटना पितृभक्ती आणि मातृशक्तीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. पुत्राचा सर्वांत मोठा धर्म म्हणजे आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेचा मान राखणे. रामायणामध्ये इक्ष्वाकू, दिलीप, रघू, अज, दशरथ व त्यानंतर राम हे विविध ब्रह्मांडांत वेगवेगळ्या रूपांत असल्याची परंपरा आहे. त्यामुळे श्राद्धपक्षात किमान पाच ते सात पिढ्यांचे स्मरण करण्याचा सल्ला मोरारीबापू यांनी दिला.

‘समाधान, त्याग आणि वैराग्य हेच आपल्या परंपरेचे आरसे आहेत. मुंगीपासून सूर्यापर्यंत प्रत्येक जीवाला वंदन करावे. आयुष्यात जास्त लालसा न ठेवता निसर्गाशी एकरूप व्हा,’ असे सांगत त्यांनी गती म्हणजे आतला विकास आणि वेग म्हणजे बाहेरचा हलकल्लोळ आहे हाच गती आणि वेगातील फरक स्पष्ट केला. हाच संदेश युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी नियती, निमित्त आणि नीती हे गीतेचे तीन संदेश सांगितले. 

मोरारीबापू म्हणाले, विज्ञानाचा चमत्कार पाहा. यवतमाळ येथे सुरू असलेला हा रामकथा सोहळा दररोज १७० देशांतील भाविक पाहत आहेत. ‘लोकमत भक्ती’ या यू-ट्यूब चॅनेलसह ‘लोकमत डॉटकॉम’ व आस्था चॅनलवरून या कार्यक्रमाचे थेट लाइव्ह प्रक्षेपण सुरू आहे.

कर्माने फळासाठी नव्हे, विश्रांतीसाठी असावे

मोरारीबापूंनी सिद्धीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, ‘सिद्धी म्हणजे चमत्कार नव्हे, तर शुद्धी आहे वचनशुद्धी, विचारशुद्धी, मनशुद्धी, चित्तशुद्धी, बुद्धिशुद्धी, अहंकारशुद्धी आणि ईश्वर स्मरण ही खरी सिद्धी असल्याचे सांगत गुरूने दिलेला विश्वास जपा; सुफी परंपरेत यालाच ‘डिझाईन’ म्हणतात.’ 

त्यांनी आदिशंकराचार्यांनी सांगितलेल्या पाच विश्वासांचा वचनविश्वास, मंत्रविश्वास, ध्रुवविश्वास, पात्रविश्वास आणि वटविश्वास यांचा उल्लेख करून वटवृक्षाप्रमाणे आपल्या कर्माने फळासाठी नव्हे तर विश्रांतीसाठी असावे, असा संदेश दिला.

रामकथेतून सत्य, प्रेम, करुणेचा मार्ग : डॉ. दर्डा

बापूजींची कथा ही केवळ रामकथा नसून खरी जीवनकथा आहे. त्यांच्या वाणीमुळे सत्य, प्रेम आणि करुणेचा मार्ग दिसतो. आपण यवतमाळ तसेच आमच्या विदर्भासाठी एका पवित्र तीर्थासमान आहात, आपल्या कथेमुळे नवीन चेतना आणि ऊर्जेचा संचार होत असून आज रामकथा जिथे सुरू आहे, तो परिसर आमच्यासाठी खऱ्या अर्थाने संस्कारतीर्थ व संस्कारयज्ञ बनला आहे. आपण देत असलेला रामनामाचा मधुर रस जीवनाचा सत्यमार्ग दाखवतो, असे सांगताना त्यांनी यवतमाळमध्ये कार्यक्रमादरम्यान बरसलेल्या पावसाचा विशेष उल्लेख केला, पाण्याचे आमचे जुने नाते आहे, आम्ही जेव्हा-जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम घेतो, तेव्हा-तेव्हा पाऊस बरसतोच, असे सांगत ‘ऐ कज़ा तुझे जीद है, यहाँ बिजलीयाँ गिराने की, हमें भी जीद है, वहीं आशियाँ बनाने की...’ हा शेर सादर करत वातावरण भारावून टाकले.

Web Title: Ramayana is not just a story but a religion, an art of living: Morari Bapu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.