पावसाची दडी बियाणे - कंपन्यांच्या पत्थ्यावर
By Admin | Updated: June 28, 2014 23:46 IST2014-06-28T23:46:46+5:302014-06-28T23:46:46+5:30
मृग नक्षत्रात जिल्ह्यात एक पाऊस झाला. या भरवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. बीज अंकुरेल अशी आशा त्यांना होती. मात्र बहुतांश ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडे धाव घेतली.

पावसाची दडी बियाणे - कंपन्यांच्या पत्थ्यावर
शेतकरी सैरभैर : कृषी केंद्र संचालकांचे हात वर
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
मृग नक्षत्रात जिल्ह्यात एक पाऊस झाला. या भरवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. बीज अंकुरेल अशी आशा त्यांना होती. मात्र बहुतांश ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडे धाव घेतली. तेथे त्यांची निराशा केली. ‘आमचे बियाणे चांगले आहे, पावसाअभावी उगवण झाली नाही’, अशी भूमिका विक्रेत्यांनी घेतली. एकूणच पावसाची दडी कंपन्या आणि विके्रत्यांच्या पत्थ्यावर पडली. वास्तविक बाजारात बोगस बियाणे आल्याची बाब सर्वश्रुत आहे.
जिल्ह्यात कृषी विभागाने घेतलेल्या बियाण्यांच्या २२ नमुन्यांचा अहवाल फेल आला. २५० क्विंटल बियाणे परत करण्यात आले. मात्र या कंपन्यांचे नाव कृषी विभागाने गुलदस्त्यात ठेवले. कृषी विभागाच्या बाहेर जिल्ह्यातील भरारी पथकाने बोगस बियाणे जिल्ह्यात जप्त केले. कपाशीचे पॅकेट्स तयार करणाऱ्या बियाणे कंपनीचे घबाड बाहेर आले. यासारखे अनेक प्रकार पेरणीच्या तोंडावरच उघड झाले. परवाना न मिळालेल्या कंपन्यांनी थेट गावामध्ये बियाण्यांची विक्री केली. पेरणीनंतर १२ ते १५ दिवस लोटल्यानंतरही बियाणे उगवले नाही. वरुणराजाने पाठ फिरविणे ही बाबच
बोगस कंपन्यांच्या फायद्याची ठरली आहे.
टोल फ्री क्रमांकाच्या पाट्या गायब
फसवणूक झाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. तशी पाटी दुकानात लावण्याची सूचना आहेत. मात्र विके्रत्यांनी या पाट्या काढून ठेवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तक्रार नोंदविता येत नाही. बियाणे विक्रीचा परवाना दुकानात ठेवण्याच्या सूचना आहे. परवानाप्राप्त बियाण्यांची यादी आणि महत्वाचे दस्तावेज त्यासाठी आवश्यक आहे. असे असले तरी, ही गंभीर बाब विक्रेते दडवितात. परवाना नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारतात.