चेन मार्केटिंगद्वारे फसविणारे रॅकेट सक्रिय
By Admin | Updated: June 25, 2014 00:43 IST2014-06-25T00:43:01+5:302014-06-25T00:43:01+5:30
गुंतविलेल्या रकमेवर तिप्पट, चौपट फायद्याचे आमिष देऊन मल्टी लेव्हल चेन मार्केटींगद्वारे फसविणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. चेन मार्केटींगवर बंदी असली तरी सेल्स आॅफीसर नियुक्त करून जनतेला लुबाडण्याचा

चेन मार्केटिंगद्वारे फसविणारे रॅकेट सक्रिय
अशोक काकडे - पुसद
गुंतविलेल्या रकमेवर तिप्पट, चौपट फायद्याचे आमिष देऊन मल्टी लेव्हल चेन मार्केटींगद्वारे फसविणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. चेन मार्केटींगवर बंदी असली तरी सेल्स आॅफीसर नियुक्त करून जनतेला लुबाडण्याचा नवा फंडा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात सक्रिय या रॅकेटने आपला मोर्चा विदर्भाकडे वळविला आहे. पुसदमधील एका हॉटेलमध्ये सेल्स आॅफीसरची गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे.
कमी वेळात आणि मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखविले जात असल्याने सर्वसामान्य जनता या कंपन्यांच्या जाळ्यात अडकत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन नावाने नोंदणी केली जाते. बंपर महाईनामी योजना असल्याचे सांगितल्या जाते. यासाठी सर्व व्यवहार मात्र तोंडीच समजावून सांगितला जातो. मात्र सभासद झाल्यावर इंग्रजीमध्ये असलेला अर्ज भरून घेतला जातो. अशा पद्धतीने पुसद परिसरात एका रॅकेटने खेड्यापाड्यातील जनतेला लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. भरपूर आर्थिक फायदा होत असल्याने अनेकजण राजीखुशीने यात सहभागी होतात. मात्र नंतर फसवणूक झाली की कपाळावर हात मारून घेतात. या योजनेमध्ये डायमंड, डायमंड प्लस, गोल्ड, गोल्ड प्लस, प्लॅटिनम, प्लॅटिनम प्लस असे सहा वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड देण्यात येतात. सभासदाने १० हजार रुपये भरल्यास तो सेल्स आॅफीसर होतो. त्यानंतर त्याने काही लोकांना जोडले की तो फिल्ड आॅफीसर होतो. असे करीत तिसऱ्या पदावर जाणाऱ्या व्यक्तीला कंपनी १५ वर्षापर्यंत सहा हजार रुपये महिना देण्याचे आमिष दिले जाते. विशेष म्हणजे कोणतेही काम करा अथवा करु नका, दरमहा रक्कम तुम्हाला मिळेल, असे छातीठोकपणे सांगितले जाते. खरे पाहता काम केले नाही तर सहा हजार रुपये कंपनी कसे देणार, हे मात्र कुणीही सांगत नाही. एखाद्या व्यक्तीने दोन लाख जमा केल्यावर त्याला सहा हजार रुपये कसे मिळणार, हेही कुणी सांगत नाही. एवढेच नाही तर सेल्स आॅफीसरने तीन लाखाचा व्यवसाय केला तर ५० हजाराची मोटरसायकल, त्याहीपुढे साडेसात लाखाचा व्यवसाय केला तर इंडिका कार आणि त्यावर व्यवसाय केला तर ४.५५ लाखाची कार भेट म्हणून देण्याचे आमिष दिले जाते. तसेच त्या रकमेच्या चौपट रकम परत करण्याची हमी दिली जाते. एवढे मोठे गौडबंगाल कशाच्या भरोशावर सुरू आहे, हे मोठे आश्चर्यच आहे.