रॅक पॉर्इंट अद्याप कागदावरच
By Admin | Updated: April 26, 2015 00:01 IST2015-04-26T00:01:14+5:302015-04-26T00:01:14+5:30
तालुक्यातील कायर येथे गेल्या पाच वर्षांपूर्वी खत उतरविण्यासाठी रॅक पॉर्इंट मंजूर झाल्याची आवई उठविण्यात आली होती.

रॅक पॉर्इंट अद्याप कागदावरच
आश्वासन हवेतच : खरीप हंगामापूर्वी पॉर्इंट होण्याची शक्यता मावळली
रवींद्र चांदेकर वणी
तालुक्यातील कायर येथे गेल्या पाच वर्षांपूर्वी खत उतरविण्यासाठी रॅक पॉर्इंट मंजूर झाल्याची आवई उठविण्यात आली होती. मात्र अद्याप हा रॅक पॉर्इंट कागदावरच दिसून येत आहे. प्रत्यक्षात अद्याप तेथे खत उतरलेच नाही.
वणी, झरी, मारेगाव, पांढरकवडा, राळेगाव आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रबी हंगामात मोठ्या प्रमाणात खत लागते. हे खत त्यांना आपापल्या तालुक्यातील खत विक्रेत्यांकडून घ्यावे लागते. या सर्व तालुक्यातील खत विक्रेते धामणगाव आणि चंद्रपूर येथील रॅक पॉर्इंटवरून खत उचलतात. तेच खत शेतकऱ्यांना पोहोचविले जाते. मात्र धामणगाव आणि चंद्रपूर येथून खत आणण्यासाठी खत विक्रेत्यांना जादा पैसे मोजावे लागतात. शेवटी त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांवरच बसतो. परिणामी शेतकऱ्यांना महागड्या दराने खते खरेदी करावी लागतात.
शेतकऱ्यांना खतासाठी जादा पैसे मोजावे लागू नये म्हणून वणी तालुक्यातील कायर येथे रॅक पॉर्इंट देण्याची मागणी होती. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपूर्वीच कायर येथे रॅक पॉर्इंट मंजूर झाल्याची घोणा तत्कालीन खासदार आणि विद्यमान केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली होती. थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कायरचा रॅक पॉर्इंट मंजूर झाल्याचे सांगितले होते. मात्र पाच वर्षे लोटूनही हा रॅक पॉर्इंट अद्याप कागदावरच दिसत आहे. काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही रॅक पॉर्इंट मंजूर झाल्याचे सांगत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोनही पदाधिकाऱ्यांची ती घोषणा अद्याप फसवी ठरली आहे.
कायर येथे रेल्वे स्थानक आहे. तेथे सिमटेंचा पॉर्इंटही आहे. याच स्टेशनवरून रेल्वे वॅगनमध्ये सिमेंट भरून ते इतरत्र पाठविले जाते. मात्र अद्याप तेथे खताचा रॅक पॉर्इंट होऊ शकला नाही. त्यासाठी तेथे गोदाम नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. पाच वर्षांपूर्वी रॅक पॉर्इंटची घोषण होताच अधिकाऱ्यांनी कायर रेल्वे स्टेशनची पाहणी केली होती. मात्र त्यानंतर पुढे काय झाले, हे अद्यापही कुणालाच काही कळले नाही. अजून कायरला रॅक पॉर्इंट झालाच नाही, हे मात्र वास्तव आहे. कायर येथे रॅक पॉर्इंट झाल्यास वणीसह झरी, मारेगाव, राळेगाव, पांढरकवडा, घाटंजी आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना खत उपलब्ध होणार आहे. खत विक्रेत्यांना चंद्रपूर अथवा धामणगाव येथून खत आणण्यासाठी करावा लागणारा खर्च कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना वाजवी दरात खत मिळू शकणार आहे. त्यासाठी कायरला रॅक पॉर्इंट होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न होण्याची गरज आहे. केवळ प्रसिद्धी अथवा श्रेय लाटण्यासाठी शेतकऱ्यांना झुलवत ठेवून रॅक पॉर्इंटची आवई उठविण्यापेक्षा प्रत्यक्षात तो सुरू करण्यासाठी खरीप हंगामापूर्वी प्रयत्न होण्याची गरज आहे.
खते राज्यमंत्र्यांकडून अपेक्षा वाढल्या
या रॅक पॉर्इंटसाठी विद्यमान केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर सुरूवातीपासून प्रयत्नरत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत केंद्रात आणि राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. केंद्र व राज्य सरकार कायर रॅक पॉर्इंटबाबबत उदासीन असल्याचा घोषा अहीर यांनी लावला होता. विरोधी सरकार असल्याने रॅक पॉईट लोंबकळत पडल्याचे ते सांगत होते. मात्र आता केंद्रात आणि राज्यातही भाजपाप्रणीत सरकार आहे. त्यामुळे यावर्षी तरी किमान खरीप हंगामापूर्वी त्यांनी कायर रॅक पॉर्इंट अस्तित्वात आण्यासाठी प्रयत्न करावे, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडेच आता खर राज्यमंत्री पदाचा कार्यभार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र यावर्षीही कायर रॅक पॉर्इंट सुरू न झाल्यास पदाधिकाऱ्यांची आश्वासने हवेतच विरण्याची शक्यता आहे.