रबीची पेरणी संकटात
By Admin | Updated: October 28, 2014 23:09 IST2014-10-28T23:09:03+5:302014-10-28T23:09:03+5:30
ढगाळ वातावरणामुळे वणी तालुक्यात रबीची पेरणी रखडली आहे. पेरणी रखडल्याने रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता बळावली आहे.

रबीची पेरणी संकटात
नांदेपेरा : ढगाळ वातावरणामुळे वणी तालुक्यात रबीची पेरणी रखडली आहे. पेरणी रखडल्याने रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता बळावली आहे.
सध्या ढगाळ वातावरण कायम आहे. त्यातच पाऊसही येत आहे. त्यामुळे खरीपातील कपाशीवर मावा-तुडतुडे, पांढऱ्या माशीने हल्ला केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव महागडी औषधी घेऊन पिके वाचवण्याकरिता फवारणी करावी लागत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे़ यापूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीत ओलावा नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत हरभरा, गहू, जवस आदी रबी पिकांची पेरणी केली नाही.
रबी हंगाम आता लांबणार आहे. पेरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ त्यामुळे रबी पिकाची पेरणी पूर्णपणे रखडली आहे़ ढगाळ वातावरणामुळे आता तरी पाऊस येईल, या आशेने काही शेतकऱ्यांनी जमीन पेरणीकरिता तयार करून ठेवली होती़ परंतु रिपरीप पावसामुळे उलट खरीप पिके दयनीय होत आहेत. सोबतच पीक विषाणूजन्य होत आहे़ त्यामुळे आॅक्टोबर महिना संपत आला तरी रबी पिकांची पेरणी झाली नाही़ परिणामी बळीराजा पुन्हा चिंतेत सापडला आहे़
वणी तालुक्यात गेल्या चार दिसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे़ या वातावरणामुळे सूर्य दर्शनही दुर्लभ झाले नाही़ वातावरणात थंडावा निर्माण झाल्याचा अनुभव येत आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये निरूत्साही परिस्थिती दिसून येत आहे. या वातावरणामुळे आजारातही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. खरीप पिक संकटात असताना किमान रबी पिकापासून तरी लाभ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती़ मात्र रबी पिकही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (वार्ताहर)