लॉकडाऊनमुळे शेतमाल वाहतुकीचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:27+5:30
खरिपाची पिके घरात येतानाची वेळ असतानाच जोरदार पाऊस झाला. सोयाबीन मातीमोल झाले. जे काही हाती लागले त्याला बाजारात भाव मिळाला नाही. काहींचा लागवड खर्चही निघाला नाही. यातून सावरण्याचा प्रयत्न म्हणून खरिपाची पिके घेतली. गहू, हरभरा यासोबतच जोडीला भाजीपाला लावण्यात आला. गेली काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारा सुरू आहे.

लॉकडाऊनमुळे शेतमाल वाहतुकीचा प्रश्न गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : संकटाच्या मालिकेला तोंड देता देता शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. अस्मानी, सुलतानी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता कोरोनाचा विळखा पडला आहे. हे संकट कमी की काय, म्हणून नैसर्गिक आपत्ती त्यात भर घालत आहे. खरिपाची पिके आणि भाजीपाला यावर संपूर्ण वर्षभराची मदार आहे. मात्र अवकाळी पाऊस, संचारबंदीमुळे माल वाहतुकीत येणारे अडथळे यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
खरिपाची पिके घरात येतानाची वेळ असतानाच जोरदार पाऊस झाला. सोयाबीन मातीमोल झाले. जे काही हाती लागले त्याला बाजारात भाव मिळाला नाही. काहींचा लागवड खर्चही निघाला नाही. यातून सावरण्याचा प्रयत्न म्हणून खरिपाची पिके घेतली. गहू, हरभरा यासोबतच जोडीला भाजीपाला लावण्यात आला. गेली काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारा सुरू आहे. यामध्ये वाळलेला गहू झोपला. काहींची गहू काढण्याची तयारी सुरू असतानाच पावसाने त्यावर पाणी फेरले. हरभऱ्याचीही माती झाली. शेतात असलेला भाजीपालाही सडण्याच्या मार्गावर आला. पालक, सांभार, चवळी, घोळ या भाज्या हाती लागल्या नाही. टमाटे, भेंडी, चवळीच्या शेंगा, कारले आदी भाज्या काही ठिकाणी खराब झाल्या. राहिलेला माल बाजारात विकून पैसा करण्याचा मनसूबा असतानाच कोरोनामुळे अडथळे निर्माण होत आहे. शेतातून तोडलेला माल शहरात विकण्यासाठी नेत असतानाच टाळेबंदीचा सामना करावा लागत आहे. मार्गात जागोजागी होणारी चौकशी, चौकशी करणाऱ्यांचे समाधान झाले नाही तर दंडुके याबाबींना तोंड द्यावे लागत आहे. कसाबसा मंडईत गेलेला माल अतिशय कमी दराने विकावा लागत आहे. कधीकधी तर वाहतूक खर्चही निघत नाही. शेतातील भाजीपाला तोडण्यासाठी मजूर वर्ग उपलब्ध होत नाही. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले. जणू त्यांच्या विकासालाच टाळे लागल्याचे चित्र आहे.
टरबूजाचा दर तीन रुपये किलो
टरबूज ठोक भावात केवळ तीन रुपये किलो दराने विकावे लागत आहे. युवा शेतकऱ्यांच्या प्रयत्नावर यामुळे पाणी फेरले जात आहे. तालुक्यात जवळपास ४० युवकांनी टरबुजाची शेती केली आहे. लॉकडाऊनमुळे तुरीच्या खरेदीलाही सुरुवात झाली नाही. केवळ आॅनलाईन नोंदणी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहे.