पात्रता परीक्षेत केवळ तीन टक्के शिक्षक उत्तीर्ण
By Admin | Updated: June 28, 2014 23:48 IST2014-06-28T23:48:27+5:302014-06-28T23:48:27+5:30
डी.एड. पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्र मिळविणे शासनाने बंधनकारक केले. केवळ तीन प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. नुकताच परीक्षेचा निकाल लागला

पात्रता परीक्षेत केवळ तीन टक्के शिक्षक उत्तीर्ण
यवतमाळ : डी.एड. पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्र मिळविणे शासनाने बंधनकारक केले. केवळ तीन प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. नुकताच परीक्षेचा निकाल लागला असून केवळ तीन टक्के शिक्षक पात्र ठरले आहे.
जिल्ह्यातून टीईटीच्या परीक्षेसाठी २७ हजार डी.एड. पात्रताधारक बसले होते. मात्र यापैकी केवळ ८७४ उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी डी.एड.धारकांचा चांगलाच कस लागत आहे. शिक्षक होण्यासाठी पात्रता परीक्षेचा अडथळा पार करताना अनेकांची दमछाक होणार आहे. आज डी.एड. प्रवेशाकडे कोणीच फिरकताना दिसत नाही. पूर्वी हमखास नोकरीचे क्षेत्र म्हणून डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला जात होता. डी.एड. पात्रताधारकांची कधीकाळी चांगलीच डिमांड होती. मात्र आता जिल्हा परिषद शाळांना घरघर लागल्याने पदभरतीच केली जात नाही. अशा स्थितीत राज्य शासनाने डी.एड. धारकांसाठी शिक्षक पात्रता प्रमाणपत्र बंधनकारक केले. यासाठी परीक्षा घेण्यात आली. बेरोजगार असलेल्या अनेक डी.एड.धारकांनी मोठ्या संख्येने ही परीक्षा दिली. मात्र अतिशय कठीण असलेल्या या परीक्षेत केवळ ८७४ जण उत्तीर्ण झाले आहे. त्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिक्षक पात्रतेचे प्रमाणपत्र दिले जात आहे. पहिल्या पेपरमध्ये ५२९ तर दुसऱ्या पेपरमध्ये ३४५ जण पात्रता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले आहे. यापैकी २५७ जणांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले असून ६१७ जणांचे प्रमाणपत्र अद्यापही शिक्षण विभागातच आहे.
पहिल्यांदाच टीईटी परीक्षा झाल्यामुळे अनेकांना अभ्यासाचा अंदाज आला नाही. त्यामुळे निकाल घसरल्याचे सांगितले जाते. शासनाकडून ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी तीन वेळा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता होणाऱ्या टीईटी परीक्षेत निकालाची टक्केवारी उंचावेल, अशी आशा शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. पात्रता परीक्षा देवून प्रमाणपत्र मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी म्हणून ताटकळत राहावे लागणार आहे. सध्या तरी जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत. अनेक शाळांमध्ये पटसंख्या रोडावल्याने तेथील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. या शिक्षकांनाच शासनाने पटसंख्येची अट शिथील करून दिलासा दिला आहे. अशा स्थितीत नव्याने भरती करणे शक्य नसल्याचेही सांगण्यात येते. (कार्यालय प्रतिनिधी)