पुसदचे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST2020-03-06T06:00:00+5:302020-03-06T06:00:09+5:30

२४ डिसेंबर १९८८ रोजी या केंद्राचे तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तत्कालीन सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. राज्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल उपाख्य बाबूजी दर्डा, तत्कालीन ऊर्जा, समाजकल्याण व विधानकार्यमंत्री सुधाकरराव नाईक आदींंच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन झाले.

Pusad's television broadcast station will close | पुसदचे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद होणार

पुसदचे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद होणार

ठळक मुद्दे३१ मार्चची डेडलाईन : ३२ वर्षांपूर्वी सुरू झालेले प्रक्षेपण थांबणार, नागरिकांचा हिरमोड, लोकप्रतिनिधी उदासीन

प्रकाश लामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तब्बल ३२ वर्षांपूर्वी देशातील दिग्गज नेत्यांच्या हस्ते उद्घाटन झालेले व शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेले भारत सरकारच्या अधिपत्याखालील येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र येत्या ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आाहे. या धक्कादायक वास्तवामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष धुमसत असून तिन्ही आमदार व खासदार उदासीन असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पुसद शहर हे माजी मुख्यमंत्रीद्वय दिवंगत वसंतराव नाईक व दिवंगत सुधाकरराव नाईक यांची कर्मभूमी आहे. दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या महत्प्रयासाने येथे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र ३२ वर्षांपूर्वी मंजूर झाले. २४ डिसेंबर १९८८ रोजी या केंद्राचे तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तत्कालीन सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. राज्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल उपाख्य बाबूजी दर्डा, तत्कालीन ऊर्जा, समाजकल्याण व विधानकार्यमंत्री सुधाकरराव नाईक आदींंच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन झाले.
शहराची जिल्हा निर्मितीकडे वाटचाल सुरू असून शहराची लोकसंख्या जवळपास एक लाख ३५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र केंद्र सरकारने तालुका पातळीवरील दूरदर्शन केंद्र अचानकपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांनी धुमाकूळ घातला असला तरीही येथे दूरदर्शनचे प्रक्षेपण पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. तरीही नागरिक अथवा लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पुसदचे वैभव असलेले दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र अचानकपणे ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे. शहराला राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक, भाजपचे विधान परिषद आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, काँग्रेसचे आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांच्या रूपाने तीन आमदार व खासदार भावना गवळी लाभलेले आहेत. मात्र हे सर्व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे दिसत आहे.

दूरदर्शनच्या सहायक अभियंत्यांचा दुजोरा
पुसदचे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद होणार असल्याच्या वृत्ताला येथील दूरदर्शनचे वरिष्ठ सहायक अभियंता एस.डी. बन्सोड यांनी दुजोरा दिला. त्यामुळे ३१ मार्चल हे केंद्र बंद होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र अद्याप एकाही लोकप्रतिनिधीला याबाबत कल्पना नसल्याचे दिसते.

पुसदचे मंजूर झालेले एफएम केंद्र उमरखेडला पळविले
दोन वर्षांपूर्वी शहरासाठी मंजूर करण्यात आलेले आकाशवाणी केंद्र (एफएम) राजकीय उदासीनतेपोटीच उमरखेडला पळविण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. परिणामी आकाशवाणीचे कार्यक्रम पुसदकरांना ऐकता येत नाही. जिल्हा पातळीवर आकाशवाणी केंद्राच्या फ्रिक्वेन्सीची मर्यादा ९० किलोमीटर एवढी असते. त्यामुळे यवतमाळ, नांदेड व अकोला आकाशवाणी केंद्र कार्यक्रम फ्रिक्वेन्सी मॅच होत नसल्याने शहरात या सर्व आकाशवाणीचे एफएम सिग्नल शून्य होतात. त्यामुळे नागरिकांना आकाशवाणीचे कोणतेही कार्यक्रम ऐकता येत नाहीत. परिणामी नागरिकांमध्ये याबाबतही तीव्र असंतोष धुमसत आहे. एफएम केंद्र केंद्र एका युनियन लिडरच्या आग्रहामुळे उमरखेडला पळविण्यात आले. याबाबत येथील लोकप्रतिनिधी अनभिज्ञ असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. खासदार व तिनही आमदारांनी दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र पूर्ववत सुरू ठेवण्याबाबत व मंजूर आकाशवाणी केंद्र परत पुसदला आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी रास्त अपेक्षा आहे.
 

Web Title: Pusad's television broadcast station will close

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.