पुसद वीज कर्मचारी वसाहतीची दैैना
By Admin | Updated: March 7, 2017 01:27 IST2017-03-07T01:27:22+5:302017-03-07T01:27:22+5:30
संपूर्ण शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या वीज कर्मचारी वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाली असून येथील कर्मचारी जीव मुठीत घेऊन राहतात.

पुसद वीज कर्मचारी वसाहतीची दैैना
देखभालीचा अभाव : तक्रार करूनही महावितरणच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष
पुसद : संपूर्ण शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या वीज कर्मचारी वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाली असून येथील कर्मचारी जीव मुठीत घेऊन राहतात. वसाहत परिसरात घाणीचे साम्राज्य असून इमारतींची दारे व खिडक्याही तुटल्या आहेत. याबाबत येथील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल मात्र घेतली नाही.
पुसद येथील श्रीरामपूर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज वितरणच्या विद्युत भवनजवळ कर्मचारी वसाहत आहे. दोन इमारतीत १६ गाळे असून या ठिकाणी वीज वितरणचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी राहतात. १९८३ साली बांधलेल्या या गाळ्यांमध्ये एक हॉल, स्वयंपाकगृह, शौचालय आणि स्नानगृह आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून देखभाल दुरुस्तीच करण्यात आली नाही. स्लॅबचे प्लास्टर उखडून पडत असून रंगरंगोटीही करण्यात आली नाही. काही कर्मचाऱ्यांनी आपल्या निवासस्थानातील आतील बाजूने रंगरंगोटी केली. परंतु पावसाळ्यात भिंतीला ओल येत असल्याने रंगरंगोटीही कुचकामाची ठरते. वसाहत परिसरही घाणीने माखलेला आहे. वसाहतीच्या एका कोपऱ्यात मोठा उकिरडा असून स्वच्छतेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही.
वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना रात्री बे रात्री कामावर जावे लागते. अशा परिस्थितीत या परिसरात सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. परंतु सुरक्षेची कोणतीही हमी नसते. दारे, खिडक्या तुटलेली असल्याने या निवासस्थानात राहणाऱ्या महिलांमध्ये कायम भीतीचे वातावरण राहते. अधिकाऱ्यांचे निवासस्थाने चांगले आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची दुरवस्था येथे हे चित्र येथे दिसून येते. याबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी दिल्या. परंतु पारेषणने दुरुस्ती करावी की वितरणने, या घोळात डागडुजी अडकल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. (कार्यालय चमू)
नळाचे पाणी दूषित
वीज कर्मचारी वसाहतीला जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनने पाणी पुरविले जाते. परंतु या वसाहतीत येणारा पाईप शौचालयाच्या चेंबरजवळून आलेला आहे. तसेच ठिकठिकाणी हा पाईल लिकेज आहे. त्यामुळे घाण पाणी येत असून यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कर्मचारी कुलकेजचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवित असल्याचे दिसून येते.