नगदीच्या पिकाची उधारीत खरेदी

By Admin | Updated: December 22, 2014 22:54 IST2014-12-22T22:54:16+5:302014-12-22T22:54:16+5:30

विदर्भातील नगदी पीक म्हणून कापसाला संबोधले जाते. मात्र या व्यवस्थेत हे नगदी पीक उधारित विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नापीकी असूनही कापसाला बाजारात अपेक्षित मोल मिळत नाही.

Purchase of cash crops | नगदीच्या पिकाची उधारीत खरेदी

नगदीच्या पिकाची उधारीत खरेदी

विकण्यासाठीही सोपस्कार : १५ ते २० दिवसानंतर मोबदला
सुरेंद्र राऊत - यवतमाळ
विदर्भातील नगदी पीक म्हणून कापसाला संबोधले जाते. मात्र या व्यवस्थेत हे नगदी पीक उधारित विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नापीकी असूनही कापसाला बाजारात अपेक्षित मोल मिळत नाही. खासगी व्यापारीच काय शासकीय यंत्रणाही उपकार केल्यासारखी कापूस खरेदी करत आहे.
शेतकऱ्यांनी विविध संकट झेलून कापसाचे पीक घेतले आहे. नफा तर सोडाच लागवड खर्च निघतो की नाही याचीही शाश्वती नाही. त्याच्या फसलेल्या अर्थचक्राचे चाक कसे तरी गतिमान करण्यासाठी घरात आलेला कापूस विकण्यासाठी तो बाजारपेठेत धडपडत आहे. मात्र येथेही प्रशासकीय यंत्रणेकडून त्याची थट्टाच केली जात आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याचा कापूस घेण्यासाठी सीसीआयने पणन महासंघाच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू केले आहे. हा कापूस घेत असताना सीसीआयकडून सर्वच शासकीय सोपस्कार पार पाडून घेतले जातात. यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत सापडला आहे. एवढे करूनही या नगदीच्या पिकाचा मोबदला शेतकऱ्याच्या हातावर लगेच ठेवला जात नाही. त्यासाठी १५ ते २० दिवस वाट पहावे लागते.
खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकण्यासाठी गेले तर ते हमी भावापेक्षाही कमी दरात खरेदी करतात. नगदीच्या या पिकाची आज बाजारात पुरती दैनावस्था झाली आहे. प्रत्येकाकडून जागतिक मंदीचे कारण देत संकटात असलेल्या शेतकऱ्याला फसविण्याचे काम केले जात आहे.
टोकण मिळविण्यासाठी भुर्दंड
कापूस विकण्यासाठी बाजार समितीतून टोकण घेणे आवश्यक आहे. हे टोकण मिळविण्यासाठी शेतकऱ्याला खरेदी केंद्रापासून कापसाने भरलेले वाहन आणि सात-बारा घेऊन बाजार समिती गाठावी लागते. तेथे असलेले फेडरेशन व सीसीआयचे कर्मचारी कापसाची मॉश्चर तपासणी करून सात-बारा पाहतात. त्यानंतर वाहनाचा क्रमांक नोंद करून टोकण दिले जाते. खरेदी केंद्रापासून टोकण वितरण केल्या जात असलेल्या बाजार समितीचे अंतर किमान १० ते १५ किमी असल्याने या अतिरिक्त अंतराने वाहन भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. यवतमाळात एमआयडीसी परिसरातील जिनिंगमध्ये पणनची खरेदी केली जाते. तर टोकण घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत यावे लागते.
स्टेपलचा फास
शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाला ३० मिलीमीटरचा स्टेपल लागल्यानंतरच क्विंटलमागे चार हजार ५० रुपये हा भाव दिला जातो. २७ ते २८ मिलीमीटर स्टेपल लागलेल्या कापसाला क्विंटलमागे तीन हजार ९५० इतका दर दिला जातो. मॉश्चर आणि स्टेपल या दोन तपासण्यातून कापूस पास झाल्यानंतर कट्टी वगळता शेतकऱ्याच्या हाती पडणारी रक्कम किती, हे कुणीच सांगू शकत नाही. उधारित विकण्यासाठीही या चाचण्या शेतकऱ्यांना बाजारपेठेत आल्यानंतर द्याव्याच लागतात.

Web Title: Purchase of cash crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.